पुणे : पर्यायी रस्त्यांचे काम अपूर्ण असल्याने नाराजी | पुढारी

पुणे : पर्यायी रस्त्यांचे काम अपूर्ण असल्याने नाराजी

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा :  श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम असलेल्या आद्य रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाल्हे (ता. पुरंदर) येथील पालखीतळापासूनच्या पर्यायी रस्त्यांची दुरुस्ती सूचना देऊनही न केल्याने श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख अ‍ॅड. विकास ढगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकारीवर्गाला याबाबत जाब विचारत तत्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणीवजा सूचना केली. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा शनिवारी (दि. 17) वाल्हे येथे मुक्कामी येत आहे. या पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थान व पुरंदर प्रशासनाकडून गुरुवारी (दि. 15) वाल्हे येथील पालखीस्थळाची पाहणी करण्यात आली.

वाल्हे पालखीतळापासून सुकलवाडी-झिरपवस्ती, गुळूंचे मार्गे निरा येथील रस्ता, तसेच पालखीतळापासूनचा सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी मार्गे राख येथे जाणार्‍या रस्त्यांवर खड्डे पडून दुरवस्था झालेली आहे. यापूर्वी आळंदी देवस्थान पदाधिकारी व प्रशासनाने केलेल्या पालखीतळाच्या पाहणीवेळी दोन्ही रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या होत्या. मात्र, वाल्हे मुक्कामासाठी पालखी सोहळा येण्यास अवघा एकच दिवस राहिला असतानाही या रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे पालखी सोहळाप्रमुख अ‍ॅड. विकास ढगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत, संबंधित अधिकारीवर्गाला याबाबत जाब विचारत धारेवर धरले. तसेच दोन्ही रस्त्यांचे काम तत्काळ करावे.

जेणेकरून वारकर्‍यांची गैरसोय होऊ नये, याची योग्य ती दखल घ्यावी, अशा सूचनाही अ‍ॅड. ढगे पाटील यांनी केल्या. जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, पालखी सोहळा प्रमुख अ‍ॅड. विकास ढगे-पाटील, तहसीलदार विक्रम राजपूत, नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी, गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार, पुरंदर- भोर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, उपअभियंता संजय गीते, शाखा अभियंता दत्तात्रेय गावडे, उपविभागीय अभियंता स्वाती दहिवाल, पोलिस निरीक्षक उमेश तावसकर, सरपंच अमोल खवले, ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे, प्रशासक एन. डी. गायकवाड, तलाठी सुधीर गिरमे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button