पिंपरी : वॉटर पार्कमध्ये बुडून सहा वर्षीय मुलीचा मृत्यू | पुढारी

पिंपरी : वॉटर पार्कमध्ये बुडून सहा वर्षीय मुलीचा मृत्यू

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : सेंटोसा वॉटर पार्क येथील स्वीमिंग पूलमध्ये बुडून सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. 12) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. शाहिरा याकूबअली मुल्ला (वय 6), असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार राकेश पालांडे यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, वॉटर पार्कचे मॅनेजर अजय हरिलाल हिंदुजा (रा. पिंपळे सौदागर), राहुल आबा मोरे (रा. रावेत), भगवान काळे (रा. शेळकेवस्ती, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी (दि. 12) शाहिरा तिची आई समशाद, भाऊ अयान आणि रयान यांच्यासोबत सेंटोसा वॉटर पार्क येथे पिकनिकसाठी गेली होती. दरम्यान, वॉटर पार्क परिसरात खेळून झाल्यानंतर शाहिराने खाऊ खाल्ला. त्यानंतर शाहिराची दोन्ही भावंडे अयान आणि रयान पुन्हा कृत्रिम लाटा असलेल्या टँकमध्ये पोहण्यासाठी गेले. त्या वेळी समशाद यांचे लक्ष नसताना शाहिरा पाण्यात पडली. शाहिराला पोहता येत नसल्याने काही वेळातच तिचा बुडून मृत्यू झाला. मुलगी हरवल्याचे समशाद यांच्या लक्षात आले.

सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर शाहिरा टँकमध्ये पडल्याचे समोर आले. शाहिराला बाहेर काढून नजीकच्या रुग्णलयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. वॉटर पार्कचे मालक आणि मॅनेजर यांनी लहान मुलांच्या दृष्टीने सुरक्षेची काळजी न घेतल्याने ही दुर्घटना घडली. तसेच, लाईफगार्डही जागेवर नव्हते. सुरक्षेबाबत फलकही लावण्यात आले नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर सुरुवातीला रावेत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद घेण्यात आली होती. मात्र, चौकशीदरम्यान आरोपींच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले. त्यानुसार, गुन्हा नोंद केला आहे. रावेत पोलिस तपास करीत आहेत.

सीसीटीव्ही फुटेज नाही

शाहिरा नेमकी कशी पडली, याबाबत खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, दरम्यानच्या काळात महिलांनी टँकसमोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर आक्षेप घेतल्याने तेथील कॅमेरे हटवल्याचे आरोपींकडून सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांना तपासात मोठ्या अडचणी येत आहेत. शाहिरा पाण्यात पडली त्या वेळी टँकमध्ये मोठी गर्दी होती. शाहिरा बुडत असताना आजूबाजूला पिकनिकला आलेले नागरिक खेळत होते. मात्र, त्या वेळी पाण्यात बुडत असताना शाहिराने केलेली तडफड कोणाच्याही लक्षात आली नाही. तसेच, लाईफ गार्डही जागेवर नसल्याने चिमुरडीला आपले प्राण गमवावे लागल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा

पिंपरी : शिक्षण मंडळाच्या माजी सभापतीसह चौघांवर विनयभंगाचा गुन्हा

सप्तशृंगी देवी मंदिरात तुर्तास ड्रेसकोड नाही; विश्वस्त, ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

 

Back to top button