राडारोडा जाग्यावरच ! पावसाळापूर्व कामे पूर्ण झाल्याचा महापालिकेचा दावा फोल | पुढारी

राडारोडा जाग्यावरच ! पावसाळापूर्व कामे पूर्ण झाल्याचा महापालिकेचा दावा फोल

पुणे :  पुढारी वृत्तसेवा :  पावसाळ्यापूर्वी करावयाची गटारे, चेंबर आणि नालेसफाईची कामे 100 टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. प्रत्यक्षात मात्र चेंबर आणि पावसाळी गटारे यामधून काढलेला राडारोडा जागेवरच पडून असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे प्रशासनाचा दावा कितपत खरा आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महापालिकेकडून दरर्षी पावसाळ्यापूर्वी विविध कामे केली जातात. मागील पावसाळ्यामध्ये पाणीपुरवठा व ड्रेनेजलाइनच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर रस्तेखोदाई झाली होती. खोदलेले रस्ते योग्यरीत्या दुरुस्त न केल्याने प्रशासनावर टीका झाली होती. पावसाळ्यानंतर प्रशासनाने शहरातील विविध भागांतील रस्त्यांच्या दुरुस्तीची पाच पॅकेजमध्ये निविदा काढली आणि रस्तेदुरुस्तीची कामे वेगाने करून घेतली.
चालू वर्षीही महापालिकेकडून शहरातील ओढ्यांमधील राजारोडा काढून साफसफाई करण्यासोबतच पावसाळी गटारे आणि चेंबर दुरुस्त आणि साफसफाई करण्याचे काम हाती घेण्यात आले. महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी कामांची पाहणी करून कामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना दिली होती. शिवाय निकृष्ट दर्जाची कामे करणार्‍या ठेकेदाराला आणि संबंधित अधिकार्‍यास कारणे दाखवा नोटीसही बजाविल्या.
आता महापालिका प्रशासनाने प्रसिद्धिपत्रक काढून नाल्यामधील 95 पैकी 95 अडचणींची व धोकादायक ठिकाणे, 382 कल्व्हर्ट, 165 किमी लांबीचे नाले, 48 हजार चेंबर, 184 किमी लांबीची पावसाळी गटारे आदींची साफसफाई केल्याचा दावा केला आहे. याशिवाय  रस्त्यावर पाणी साचू नये, यासाठी पदपथाच्या कडेने नवीन पावसाळी चेंबर तयार केल्याचेही सांगितले आहे.
व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रारींचे आवाहन
पावसाळ्यामध्येही ही कामे आवश्यकतेनुसार केली जाणार आहेत. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास सुरू ठेवला जाणार असून, नागरिकांनी 9689930531 व 9689935462 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांवर तक्रारी करण्याचे आव्हान केले आहे.फफ
यंदा पावसाळी कामे चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहेत. ज्या ठिकाणी साफसफाईबाबत नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत, ज्या ठिकाणी राडारोडा जागेवरच पडून आहे, अशा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई  केली असून, संबंधित अधिकार्‍यांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत.
                                                                  – डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Back to top button