

कडूस (ता. खेड) येथील ढमाले शिवार परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. सोमवारी (दि. २५) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने सुदाम ज्ञानेश्वर ढमाले यांची एक शेळी फस्त केली.
शिवारातील दर्शन ढमाले हे आपल्या गोठ्यात पहाटे काम करत बिबट्या शेळी फस्त करत असताना दिसला. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. जंगलात असणारा बिबट्या नागरीवस्तीत येऊन जनावरे, माणसांना लक्ष्य करत आहेत. ढमालेशिवार परिसरात एक महिन्यापूर्वी शेतात मशागत करताना शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात बिबट्या कैद केला होता. तेव्हा वनविभागाला नागरिकांनी कळवले होते. मात्र वनविभागाने दुर्लक्ष केल्याने ही घटना पुन्हा घडली.
सध्या परिसरात रब्बी हंगामातील कांदा पिकांच्या लागवडीला वेग आला आहे. त्या वेळेवर लाईट उपलब्ध होत नसल्याने बहुतांशी वेळा शेतकऱ्यांना रात्री शेतीला पाणी द्यावे लागते. त्यातच आता बिबट्या शेतकरी बांधवांच्या पाळीवर प्राण्यांवर हल्ला करू लागल्यामुळे बिबट्याची दहशत पसरली आहे.
वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी चेअरमन सुदाम ढमाले, चांगदेव ढमाले, सुजित ढमाले, मनोहर ढमाले, जिजाभाऊ ढमाले, संदेश ढमाले, काळूराम ढमाले, दर्शन ढमाले, विठ्ठल ढमाले, रामभाऊ ढमाले, किशोर ढमाले, सुभाष ढमाले आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.