Ashadhi Wari 2023 : वारी निर्मल, स्वच्छ व्हावी : ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन | पुढारी

Ashadhi Wari 2023 : वारी निर्मल, स्वच्छ व्हावी : ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दिवस बदलत आहेत तशा सुधारणा होत आहेत. पूर्वी वारी गावातून गेली की, त्या गावाची अवस्था अतिशय वाईट होत असायची. वारीसाठी येत असल्याने वारकर्‍यांच्या आरोग्याची, स्वच्छतेची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. स्वच्छतेची जबाबदारी महत्त्वाची आहे. म्हणून वारी निर्मल आणि स्वच्छ व्हावी, ही अपेक्षा असल्याचे मत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आळंदी ते पंढरपूर मार्गावरील स्वच्छता दिंडीची सुरुवात महाजन यांच्या हस्ते विधानभवन येथे करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील विभागस्तरीय पुरस्कारांचे वितरणही या वेळी करण्यात आले.

आमदार सुनील कांबळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ‘यशदा’चे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते. महाजन म्हणाले, राज्यातील विविध भागांतून वारकरी पंढरपूरला येत असतात. वारकर्‍यांसाठी दिवाळी, दसर्‍यापेक्षाही आषाढी वारी हा मोठा उत्सव आहे. पालखी मार्गावरील रस्ते व परिसराच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरत असल्याने सर्वांनी शौचालयाचा वापर करावा. गावांमध्ये प्रत्येकाने शौचालये बांधावीत. शौचालय बांधण्यासाठी शासन निधी उपलब्ध करून देत आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा आदर्श अन्य ग्रामपंचायतींनी घ्यावा, आपलेही गाव हागणदारीमुक्त करून परिसर स्वच्छ ठेवावा. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा आणि स्वच्छता पाळावी.

कान्हेवाडी, टिकेकरवाडीला पुरस्कार
ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते 2018- 2019 व 2019-2020 या वर्षीच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान विभागस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील कान्हेवाडी, टिकेकरवाडी, सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी, कोल्हापूर जिल्ह्यातील श्रृंगारवाडी, सोलापूर जिल्ह्यातील मांडवे व सांगली जिल्ह्यातील कुंडल व चिखली ग्रामपंचायतींना विभागस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच टिकेकरवाडी ग्रामपंयाचतीला स्व. वसंतराव नाईक पुरस्कार, मान्याचीवाडी व सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर ग्रामपंचायतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देण्यात आला.

स्वच्छता दिंडीतून वारकर्‍यांचे प्रबोधन करणार
पालखी मुक्काम, विसावा, रस्त्यावर निर्माण होणारा कचरा, गाव व परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून 8 चित्ररथांच्या माध्यमातून कलापथकाद्वारे व 50 आरोग्यदूतांमार्फत स्वच्छतेचा संदेश गावोगावी देण्यात येणार आहे. प्लास्टिकचे व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्यविषयक पुस्तिका, माता सुरक्षित तर घर सुरक्षित, जागरुक पालक, सुदृढ बालक, नियमित लसीकरण अशा स्वच्छता व आरोग्यविषयक संदेशाद्वारे वारकर्‍यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.

हे ही वाचा : 

Ashadhi Wari 2023 : फुलांच्या पायघड्यांनी तुकोबारायांच्या पालखीचे लोणी काळभोरला स्वागत

Ashadhi wari 2023 : अहमदनगरवरून पंढरपूरला 385 जादा बसचे नियोजन

Back to top button