पुणे : टाकळी हाजीतील आरोग्य केंद्र घेणार मोकळा श्वास ; अतिक्रमण हटविल्याने अस्वच्छतेतूनही सुटका | पुढारी

पुणे : टाकळी हाजीतील आरोग्य केंद्र घेणार मोकळा श्वास ; अतिक्रमण हटविल्याने अस्वच्छतेतूनही सुटका

टाकळी हाजी (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  रस्तारुंदीकरणात अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यात आल्याने टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील आरोग्य केंद्राने मोकळा श्वास घेतला असून, यामुळे रुग्ण आणि आरोग्य कर्मचार्‍यांची अस्वच्छेतूनही सुटका झाली आहे.
येथील रस्तारुंदीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. परंतु, अतिक्रमणामुळे ठेकेदाराने गावठाण हद्द सोडून गावाबाहेरील कामास अग्रक्रम देऊन काम ठेवले आहे. विजेचे खांब, सांडपाण्याचे गटार, अतिक्रमणातील बांधकामे अशा अडचणींमुळे गावातील काम मागे ठेवण्यात आले होते.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील अतिक्रमणामुळेही रस्तारुंदीकरणात अडथळा येत होता तसेच आरोग्य केंद्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले होते. यामध्ये बहुतांश हॉटेल असल्याने तेथील वासामुळे रुग्णांना त्रास होत होता. आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि प्रशासन मात्र स्थानिकांचे व्यवसाय असल्याने गप्प होते. रस्त्याच्या कामामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस बजावूनही अतिक्रमण न निघाल्याने शाखा अभियंता नवनाथ शेळके यांनी स्वतः तेथे येऊन कारवाईचा बडगा उगारला आणि आरोग्य केंद्रासमोरील परिसर रिकामा केला. आता आरोग्य केंद्रही मोकळा श्वास घेऊ लागले आहे.

आरोग्य केंद्रात येणार्‍या नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था नसल्याने लोकांची गैरसोय होत होती. कंपाउंडबाहेरून व्यावसायिकांनी अतिक्रमण करून पत्र्याचे शेड उभे केल्याने आरोग्य केंद्र कुठे आहे? हे शोधावे लागत होते. मात्र, तूर्तास तरी पार्किंगची अडचण भासणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

Back to top button