राज्यात 5700, पुणे विभागात 1500 रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत

राज्यात 5700, पुणे विभागात 1500 रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : किडनीशी संबंधित आजारात डायलिसिसचा उपयोग होत नसल्यास किंवा क्रोनिक आजाराची तीव्रता वाढल्यास प्रत्यारोपणाचा पर्याय सुचवला जातो. तरुण वयात डायलिसिसऐवजी प्रत्यारोपणामुळे आयुष्याची गुणवत्ता उंचावते. सध्या राज्यात 5797 रुग्ण, तर पुणे विभागात 1500 रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. पुरेशी जनजागृती झाली नसल्याने ब्रेननडेड व्यक्तींच्या अवयवदानाचे प्रमाण खूप कमी आहे.

मधुमेह, उच्च रक्तदाब, जीवनशैलीशी संबंधित आजार अशा विविध कारणांमुळे किडनी अर्थात मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. किडनी निकामी झाल्यास ज्येष्ठ नागरिक किंवा सहव्याधी असलेल्या रुग्णांना डायलिसिस उपयुक्त ठरू शकते. तरुण वयात प्रत्यारोपण केल्यास पुढील आयुष्य सुखकररीत्या जगता येऊ शकते. राज्यात डायलिसिस करून घेणार्‍या रुग्णांच्या तुलनेत मशिनचे प्रमाण खूप कमी आहे. किडनी प्रत्यारोपणाचा खर्च 5 ते 8 लाख रुपयांच्या घरात असतो.

प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर इम्युनोसप्रेसंट औषधे दिली जातात. सुरुवातीचे एक वर्ष दर महिन्याला औषधांचा खर्च 30 ते 40 हजार रुपये आणि त्यानंतर दरमहा 10 ते 15 हजार रुपये इतका असतो. प्रत्यारोपणानंतर रुग्ण पूर्णपणे सामान्य वैवाहिक आणि वैयक्तिक आयुष्य जगू शकतो, अशी माहिती मूत्रपिंडविकारतज्ज्ञ डॉ. अच्युत जोशी यांनी दिली.

कशी होते मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रक्रिया?

किडनी प्रत्यारोपणासाठी पहिल्यांदा 'रिलेटेड डोनर'च्या पर्यायावर भर दिला जातो. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीच्या विविध तपासण्या करून त्या व्यक्तीची किडनी रुग्णाशी जुळते आहे की नाही, हे तपासले जाते. कुटुंबातील व्यक्तीची किडनी जुळत नसल्यास 'ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट अ‍ॅक्टनुसार' 'अनरिलेटेड डोनर'चा शोध घेतला जातो. यामध्ये मित्रपरिवार, नातेवाईक, ओळखीतील व्यक्ती आदींचे निकष जुळवून पाहिले जातात. 'रिलेटेड' आणि 'अनरिलेटेड' डोनर न मिळाल्यास विभागीय प्रत्यारोण समन्वय समितीकडे ब्रेनडेड व्यक्तीची किडनी मिळवण्यासाठी नाव नोंदवले जाते.

अशी आहे राज्यातील आकडेवारी

राज्य अवयव प्रत्यारोपण समितीकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, राज्यात जानेवारी 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत 193 मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.
एकूण लाईव्ह किडनी प्रत्यारोपण (1995-2022) – 11 हजार 940
राज्यात 1994 पासून नोंदणीकृत प्रत्यारोपण केंद्रे – 994 – किडनी प्रत्यारोपण केंद्रे – 123

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news