पुणे : तीन डझन अधिकारी रडारवर ; कोणाचे हात ओले? ‘रामोड’ प्रकरण कोणाला भोवणार? | पुढारी

पुणे : तीन डझन अधिकारी रडारवर ; कोणाचे हात ओले? ‘रामोड’ प्रकरण कोणाला भोवणार?

दिगंबर दराडे : 

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महसूल विभागातील बडा अधिकारी असलेल्या डॉ. अनिल रामोड याला आठ लाख रुपयांची लाच घेताना पकडल्यानंतर विभागातील त्याच्याशी संबंधित अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. तब्बल तीन डझन अधिकारी सीबीआयच्या रडारवर आल्याची माहिती समोर आली आहे. रामोडशी संबंधित पाच जिल्ह्यांचा कारभार चालत असल्याने या ठिकाणच्या संबंधित फाइलमध्ये ‘अर्थपूर्ण’ व्यवहाराची किती पाळेमुळे रुजली आहेत, याची चौकशी सीबीआय करणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने ’पुढारी’शी बोलताना सांगितले.

फाइलचा प्रवास हा छोट्या कार्यालयापासून आयुक्त कार्यालयापर्यंत होतो. आयुक्त कार्यालयातून अनेक फाइल मंत्रालयात जातात. येथील अधिकार्‍यांच्या शेर्‍यावर त्या फाइलचे भवितव्य मंत्र्यालयात ठरत असते. रामोड यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी होती. महामार्ग आणि रेल्वेल्या भूसंपादनासंदर्भातील प्रकरण त्यांच्याकडे होते. यामध्ये करोडो रुपयांचा लाभ शेतकर्‍यांना देण्यात येत होता. प्रामुख्याने यामध्ये अनेक अधिकार्‍यांकडून ही फाइल त्यांच्यापर्यंत येत असल्याने या फाइलचा शोध आता सीबीआयने सुरू केला आहे.

बायकोचा अन् स्वत:चा भाऊ खूष
प्रशासकीय अधिकारी अहोरात्र कष्ट करतात. बेहिशेबी मालमत्ता बायकोचा भाऊ आणि स्वत:च्या भावाकडे सोपवितात. यामुळे ती मंडळी मात्र खूष असतात. प्रशासनात राब राबणार्‍या अधिकार्‍यांकडे मात्र नैराश्याशिवाय काही उरत नसल्याचे देखील वास्तव अनेक भ—ष्टाचारी अधिकार्‍यांच्या केसमध्ये पाहायला मिळत आहे.

सहा कोटींत कोणाचा हातभार..?
रामोड याच्याकडे आलेल्या सहा कोटींच्या कॅशमध्ये कोणाकोणाचा हातभार लागला आहे, याचा शोध सीबीआयने सुरू केलेला आहे. ही कॅश एका कामामधून तर निश्चितपणे आलेली नाही. किती जणांकडून ही कॅश उपलब्ध झाली आहे. यामध्ये कोणाकोणाचे हात ओले झाले आहेत, याचा शोध युध्दपातळीवर सीबीआयने सुरू केला आहे. लवकरच ते तपासात उघड होणार आहे.
पोस्टिंगसाठी जीवघेणी स्पर्धा
करोडो रुपयांचा चुराडा करून हवी ती पोस्टिंग मिळविण्यासाठी अधिकार्‍यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जीवघेण्या स्पर्धेतून वैमनस्य तयार होते. हे वैमनस्य एकमेकांचे करिअर संपविण्यापर्यंत जाते. अनेक अधिकार्‍यांच्या अधिकारीच सुपार्‍या देत असल्याने प्रशासकीय खात्यात चिंतेचे वातावरण आहे. याचबरोबर करोडो रुपयांची पोस्टिंग मिळविल्यानंतर त्याची वसुली ‘रामोड स्टाईल’ने केली जाते.

हे ही वाचा :

पुणे : मार्केट यार्डातील हॉटेलला आग; तीन कामगारांचा मृत्यू

मान्सून 25 जूननंतरच जोर धरणार ; बिपरजॉय चक्रीवादळाने खेचून घेतली आर्द्रता

Back to top button