Ashadhi wari 2023 : ‘गरजवंतासाठी वारी ठरते जगण्याचा आधार’

Ashadhi wari 2023 : ‘गरजवंतासाठी वारी ठरते जगण्याचा आधार’

पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : 
स्व कर्मात व्हावे रत!
मोक्ष मिळे हातोहात
सावतांनी केला मळा,
विठ्ठल देखियेला डोळा

सावता माळी यांनी या आपल्या अभंग वाणीतून कर्मातून मोक्षची प्राप्ती होते, असे सांगितले आहे. संतांनी आपल्या अभंगातून अध्यात्माबरोबर कर्मालादेखील प्राध्यान्य दिल्याचे दिसून येते. आषाढी वारीमध्ये अनेक वारकरी पंढरपूरला जाईपर्यंत कंदमूळ, टाळ, पखवाज विकून आपला व्यवसायही सांभाळत असल्याचे दिसत आहे.

अध्यात्माला व्यवसायाची जोड
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखीबरोबर अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. महाराष्ट्रातील खेड्या-पाड्यांतून लाखो संख्येने वारकरी दाखल होतात. काही वारकरी आषाढीवारीनिमित्ताने अध्यात्माबरोबर व्यवसाय जोड कायम ठेवतात. काही वारकरी देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर वारी प्रवासादरम्यान व्यवसाय करत वारी पूर्ण करतात. वारी गरजवंतासाठी जगण्याची वारी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबई-पुणे महामार्गावर तुकाराम महाराजांच्या पालखीने दापोडीत विसावा घेतला. या वेळी अनेक वारकरी वारीबरोबर आपला व्यवसाय करत असल्याचे दिसले.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज पालखीत मी कंदमूळ विकतो. मी मूळचा नागपूरचा असून, वारीत चालण्याचा आनंद घेण्याबरोबरच आपला व्यवसायही सांभाळत आहे.
                                      – मधुकर गायकवाड, कंदमूळ विक्रेते, नागपूर

छत्रपती संभाजीनगरहून वारीसाठी आलो आहे. गेल्या पाच वर्षांपासून वारी करतो आहे. वारीत टाळ विक्री करतो. पायी वारीत उत्पन्न उभे रहावे, या हेतूने वारी करत आहे. एक टाळजोडी सत्तर रुपयांपर्यंत विकली जाते.
                                   – चंद्रकांत राजगुरू, टाळ विक्रेते, छत्रपती संभाजीनगर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news