पुण्यात मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची लागली वाट! | पुढारी

पुण्यात मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची लागली वाट!

अमोल सहारे

खडकी : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमधील रेंजहिल्सकडे जाणार्‍या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. यामुळे बोर्ड प्रशासनाचे रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. परिणामी, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाकडून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिक करीत आहेत.

पुणे-मुंबई रस्त्यावरून बोपोडी, रेंजहिल्सकडे जाणार्‍या मार्गा मेट्रोचे काम सुरू आहे. बोपोडीकडून खडकी पोलिस ठाण्याच्या मागून मेट्रो रेंजहिल्सकडे वळविण्यात आली आहे. मेट्रोचे काम जलद गतीने सुरू आहे. मात्र, या कामामुळे रस्त्याच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.

खडकी पोलिस ठाण्याजवळून जाणार्‍या रेल्वे बोगद्यापासून डावीकडे रेंजहिल्सकडे जाणार्‍या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. प्रशासनाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

रेंजहिल्स परिसरातील रस्ते दारुगोळा फॅक्टरी (अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी) आणि गॅरिसन इंजिनियर यांच्या मालकीचे आहेत. मात्र, मार्केट समोरील रस्ता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मालकीचा आहे. या रस्त्याची बोर्ड प्रशासनाकडून दुरुस्ती करण्यात येईल.

-ए. ई. संत, सहायक अभियंता, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड.

खडकी पोलिस स्टेशनजवळील रेल्वे बोगद्यावरून रेंजहिल्सकडे जाणार्‍या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्याच्या कडेला झोपडपट्टीदेखील वसली आहे. मेट्रो कामामुळे बोर्ड प्रशासनाचे रस्त्याच्या दुरुस्तीकडे कामाकडे दुर्लक्ष होत आहे.

-राजेश मोरे, सामाजिक कार्यकर्ता, खडकी

  • मेट्रोच्या कामामुळे खडकी, आरटीओ कार्यालय परिसर, पौड रोड आणि बाणेर भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे वाहनचालक व नागरिकांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी रस्तादुरुस्तीसह पदपथांची कामे अर्धवट असल्याने अपघातही होत आहेत. यामुळे रस्तादुरुस्तीसह पदपथांची कामे तातडीने करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Back to top button