बारामतीत पिस्तूल, तलवारी जप्त | पुढारी

बारामतीत पिस्तूल, तलवारी जप्त

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरातील आमराई भागात शहर पोलिसांनी छापा टाकत एका युवकाकडून गावठी पिस्तूल व तलवारी जप्त करण्यात आल्या. नेहल ऊर्फ रावण विजय दामोदरे (वय 23, रा. वडकेनगर, आमराई, बारामती) असे पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली.

पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी शहरात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणार्‍यांची गोपनीय माहिती काढून कारवाईचे आदेश शहर पोलिसांना दिले होते. त्यानुसार शहर पोलिसांनी रविवारी (दि. 11) दामोदरे याच्या घरी छापा टाकला. या कारवाईत त्याच्या घरातून एक गावठी पिस्तूल, एक मॅग्झीन व एक जिवंत काडतूस तसेच पाच धारदार तलवारी मिळून आल्या. दामोदरे याला पोलिसांना ताब्यात घेत अटक केली.

त्याला सोमवारी येथील न्यायाधीश अण्णासाहेब गिरे यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही कारवाई महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, हवालदार कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, अक्षय सिताप, तुषार चव्हाण, दशरथ इंगवले आदींनी केली. दामोदरे याने हे पिस्तूल व तलवारी का बाळगल्या होत्या? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

शस्त्र बाळगणार्‍यांची माहिती द्या

बारामती शहर व परिसरात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणार्‍यांची माहिती नागरिकांनी पोलिस ठाण्याला द्यावी. माहिती देणार्‍यांच्या नावाबाबत गुप्तता पाळली जाईल, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी केले आहे.

हेही वाचा

पुण्यात वार्ताहरावर गोळीबार; पंधरा दिवसांत दुसर्‍यांदा हल्ला

देशातील सर्व बोर्डांचे मूल्यमापन समान पातळीवर

Back to top button