रस्त्यावरील पार्किंगमुळे बारामतीचा श्वास कोंडला

रस्त्यावरील पार्किंगमुळे बारामतीचा श्वास कोंडला
Published on
Updated on

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती नगरपरिषदेने शहराच्या मध्यवर्ती भागात गणेश मार्केट भाजी मंडईच्या वरच्या मजल्यावर दुचाकी, चारचाकींसाठी भव्य पार्किंग व्यवस्था निर्माण केली आहे. परंतु रॅम्पवरून वाहन ने-आण करणे चालकांना धोकादायक वाटत असल्याने हे पार्किंग केंद्र ओस पडले आहे. दुसरीकडे शहर व उपनगरांत पार्किंगचा बोजवारा उडाला असून, वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे बारामती शहराचा श्वास कोंडला जात आहे.

शहरात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. वाहन पार्किंगचा विषय गंभीर बनत चालला असून, अतिक्रमणांची परिस्थिती 'जैसे थे' आहे. वाहतूक कोंडी हा रोजचा प्रश्न बनला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहने पार्किंग केली जात असल्याने बारामतीकरांची वाहतूक समस्येतून लवकर सुटका होण्याची शक्यता दिसत नाही. मुख्य रस्त्यावर वाहने पार्किंग करण्याची स्पर्धाच बारामती शहरात पाहायला
मिळत आहे.

वाढलेल्या उन्हामुळे रस्त्यावर गर्दी कमी असूनही सकाळी आणि सायंकाळी शहरात वाहतूक कोंडी होत आहे. शहरातील बहुतांश रस्त्यावर हातगाडे आणि वाहने पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. गणेश भाजी मंडई येथील वाहनतळ सुरू होऊनही पार्किंगमध्ये फारसा फरक पडला नाही. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता पार्किंगची व्यवस्थाही वाढविण्याची गरज आहे.

वाहतूक कोंडीमुळे एखादी रुग्णवाहिका आली तरीही तिला पुढे जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शहराबाहेरून जाणार्‍या रिंग रोडवरही हीच परिस्थिती असून, तेथे धोकादायक पद्धतीने वाहनांची वाहतूक सुरू आहे. पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी बारामतीकर करत आहेत. अनेक अवजड क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करीत आहेत. अनेकदा दंड करूनही अशी वाहने रस्त्यावरून ये- जा करीत असतात. नगरपालिका प्रशासन, पोलिस आणि आरटीओ यांनी या समस्येवर लक्ष देण्याची गरज या निमित्ताने व्यक्त होत आहे. सध्या शाळांना त्यामुळे वाहतुकीवरील ताण कमी आहे. मात्र, भविष्यात शहरातील वाहतूक कोंडीवर कायमची उपाययोजना करण्याची गरज आहे.

टिप्पर चालकांची दादागिरी

बारामती शहरातून जड वाहनांना प्रवास बंदी आहे. मात्र, तालुक्याच्या विविध भागांतून जड मालाची वाहतूक करणारे टिप्परचालक कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता भरधाव वेगाने वाहने चालवतात. गतआठवड्यात कसबा चौकात एका पादचार्‍याच्या अंगावरच टिप्पर घालण्याचा प्रकार घडला होता. यामध्ये पादचार्‍याला बाजूला करण्यात आल्याने त्याचा जीव वाचला. आरटीओ अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना खुर्च्या सोडायला वेळ नसल्याने शहराच्या वाहतुकीचा बट्याबोळ झाला आहे.

बारामती शहरातील वाहतूक कोंडीची ठिकाणे

कसबा चौक, गुणवडी चौक ते गांधी चौक, इंदापूर चौक ते भिगवण चौक, तीन हत्ती चौक, पंचायत समिती चौक, सातव चौक, पेन्सिल चौक, सूर्यनगरी, रिंग रोड, शाळा व महाविद्यालय परिसर, भिगवण रस्त्यावरील बायपास रस्ते तसेच अन्य चौक.

विक्रेत्यांनी बळकावले फुटपाथ

बारामती शहर, उपनगर तसेच रिंग रोडवर फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून, फुटपाथवर चालणेही मुश्कील बनले आहे. स्थानिक पदाधिकार्‍यांच्या सहकार्यानेच फुटपाथवर अतिक्रमण झाल्याचे खासगीत बोलले जात आहे. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी पालिका प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news