

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चर्होली, रावेत व डुडुळगाव येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पाच्या इनग्रेन आर्किटेक्ट अॅण्ड अर्बन प्लानर या सल्लागार एजन्सीने कामात दिरंगाई, चुका व अनियमितता केली आहे. त्यामुळे त्या एजन्सीकडील डुडुळगाव प्रकल्पाचे काम काढून घेण्याची कारवाई आयुक्त शेखर सिंह यांनी केली आहे. पालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सध्या चर्होली, बोर्हाडेवाडी, आकुर्डी व पिंपरी येथे गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. ती सर्व कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. रावेत येथील गृहप्रकल्प न्यायालयाच्या स्थगितीमुळे बंद स्थितीत असून, तो प्रलंबित आहे. तर, डुडुळगाव प्रकल्पाच्या कामाची गेल्या महिन्यात वर्कऑर्डर देण्यात आली आहे. ते काम लवकरच चालू करण्यात येणार आहे.
चर्होली, रावेत व डुडुळगाव येथील प्रकल्पाच्या निविदा पूर्व व निविदा पश्चात कामासाठी सल्लागार म्हणून इनग्रेन आर्किटेक्टची नेमणूक करण्यात आली होती. एजन्सीला अनुक्रमे 12 डिसेंबर 2016, 19 सप्टेंबर 2017 आणि 14 मार्च 2018 ला वर्कऑर्डर देण्यात आली. निविदा रक्कमेच्या 2.35 टक्के शुल्क अधिक सेवाकर या दराने एजन्सी काम करीत आहे. चर्होली व डुडुळगाव प्रकल्पात इनग्रेन आर्किटेक्ट एजन्सीने कामांमध्ये दिरंगाई केली असून, अनेक चुका केल्या आहेत.
तसेच, कामात अनियमितता दिसून आली आहे. डुडुळगाव येथील प्रकल्पात 1 हजार 190 सदनिका बांधण्यात येणार आहेत. प्रकल्पाचे काम एजन्सीकडून काढून घेण्यात आले आहे. ते काम क्रिएशन्स इंजिनिअर्सला देण्यात आले आहे. त्यांना निविदा पश्चात कामासाठी निविदा रक्कमेच्या 1.45 टक्के शुल्क देण्यात येणार आहे. या स्थापत्य पंतप्रधान आवास योजना (पीएमवाय) प्रकल्प विभागाच्या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
एजन्सीवर कारवाई की अभय ?
चर्होली व डुडुळगाव गृहप्रकल्पांच्या कामात इनग्रेन आर्किटेक्ट अॅण्ड अर्बन प्लानर या सल्लागार एजन्सीने दिरंगाई केली. त्यामुळे प्रकल्पास मोठा विलंब झाला. तसेच, अनेक चुका केल्या असून, अनियमितता दिसून आली आहे. त्यामुळे त्या एजन्सीवर कठोर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेने चर्होली, रावेत व डुडुळगाव या तीन प्रकल्पांपैकी केवळ एकच प्रकल्पाचे काम एजन्सीकडून काढून घेतले आहे. दोन प्रकल्प आहे तसेच एजन्सीकडे ठेवले आहेत. त्यामुळे कारवाई केली का सल्लागाराला अभय दिले आहे, अशी शंका निर्माण होत आहे.
डुडुळगाव प्रकल्पास विलंब होऊ नये म्हणून कारवाई
डुडुळगाव गृहप्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्या प्रकल्पास प्रत्यक्ष काम करताना विलंब होऊ नये म्हणून सल्लागार इनग्रेन आर्किटेक्ट अॅण्ड अर्बन प्लानर एजन्सीचे काम काढून घेतले आहे. चर्होली येथील काम अंतिम टप्प्यात आहे. तर, न्यायालयीन स्थगितीमुळे रावेतचे काम सुरू झालेले नाही, असे महापालिकेचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी सांगितले.