देहू-आळंदी मार्गावरील विश्रामस्थाने निरूपयोगी | पुढारी

देहू-आळंदी मार्गावरील विश्रामस्थाने निरूपयोगी

मोशी : पुढारी वृत्तसेवा : तीर्थक्षेत्र देहू – आळंदीला जोडणार्‍या नवीन बीआरटी रस्त्यावर उभारण्यात आलेले विश्राम थांबे सावलीअभावी अनुपयोगी ठरताना दिसून येत आहेत. रस्ता सुरू झाल्यापासूनच ही विश्रांतीस्थाने केवळ शोभेची वस्तू ठरताना दिसून येत आहेत. या मार्गावरून देहू-आळंदीस जाणार्‍या भाविकांना काही क्षण विश्रांतीसाठी बनविलेले हे स्थाने निरूपयोगी ठरत आहेत. देहू-आळंदी तीर्थक्षेत्र ठिकाणे असल्याने अनेक भाविक, वारकरी पायी यात्रा करत तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातात. त्यामुळे या भाविकांच्या सुविधेसाठी देहू-आळंदी बीआरटी रस्त्यावर विश्रांती थांबे तयार करण्यात आले आहेत.

मात्र या ठिकाणी सावली नसल्याने उष्णतेपासून तसेच पावसाळ्यात पावसापासून बचाव होत नसल्याने ही विश्रांतीथांबे निरूपयोगी ठरत आहेत. केवळ सकाळी व सांयकाळी तासभर याठिकाणी बसता येते; मात्र दिवसभर याचा उपयोग शून्य असतो. यामुळे वारकरी व पादचार्‍यांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, या विश्राम थांब्यांवर सावली शेड उभारावे, अशी मागणी होत आहे. शेड उभारले गेले तर या सर्व ठिकाणांचा वापर उन्हाळ्यात व पावसाळ्यातदेखील होऊ शकतो, असे मत नागरीक व्यक्त करत आहे. देहूपासून चिखली, कुदळवाडी, बोराटे वस्ती, मोशी देहू रस्ता चौक, हजारे वस्ती, डुडुळगाव, तापकीर नगर आदी ठिकाणी विश्रांती थांबे उभारण्यात आले आहेत. चार- पाच दिवसांवर आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा होणार आला आहे. त्यामुळे या मार्गवर पायी वारकर्‍यांची मोठी गर्दी होते. तत्पूर्वी या थांब्यांवर सावलीसाठी शेड उभे करावेत, अशी मागणी वारकरी करत आहेत.

 

Back to top button