कात्रज : आरोग्य विभागाची ‘साफसफाई’ | पुढारी

कात्रज : आरोग्य विभागाची ‘साफसफाई’

कात्रज(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग व कोंढवा-येवलेवाडी सहायक आयुक्त कार्यालयमार्फत जी-20, पालखी सोहळा तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या अनुषंगाने स्वच्छता, सुशोभीकरण, नालेसफाई इत्यादी कामे चालू आहेत. तरीही अनेक नागरिकांना याबाबतीत काहीही घेणे-देणे नसल्यासारखे दिसून येत आहेत. स्वच्छतेची व अन्य कामे सुरू असतानाच अस्वच्छता तसेच अन्य कारणांसाठी या क्षेत्रीय कार्यालयाने धडक कारवाई मोहीम हाती घेत एका दिवसात 31,350 रुपये दंड वसूल केला.

सहायक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने व विकास मोरे यांच्यासह सर्व आरोग्य निरीक्षक व मुकादम यांच्या पथकाने प्रभाग क्र. 41 मधील अप्पर डेपो रस्त्यावर भाजी मंडई ते डॉल्फिन चौकापर्यंत भाजी विक्रेते व व्यवसायधारक यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.

यामध्ये अस्वच्छता केल्याप्रकरणी 47, तर प्लास्टिक वापर करणार्‍या चौघांवर मिळून एकूण 51 पावत्या करून 31350 रुपये वसूल करण्यात आले. ही कारवाई अस्वछता, रस्त्यावर थुंकणे, प्लास्टिक याबाबत करण्यात आली आहे. कारवाईत सहभागी अमर शेरे, प्रशांत कर्णे,गणेश साठे, सचिन बिबवे तसेच सुनील चव्हाण, आकाश केंजळे, राजेन्द्र कांबळे, धनंजय लोंढे, नागप्पा धनगर आदी सहभागी झाले होते.

पालिकेतर्फे ओला-सुका कचरा, प्लास्टिक तसेच स्वच्छतेबाबत वारंवार सूचना व जनजागृती केली जाते. तरीही नियम सर्रासपणे मोडले जात आहेत. नियम मोडणार्‍या आस्थापना व नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या कारवाईद्वारे नागरिकांना शिस्त लागावी. पुणेकर नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, ही अपेक्षा आहे.

डॉ. ज्योती धोत्रे, सहायक आयुक्त, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय

Back to top button