कुरकुंभ चौकात सुसज्ज बसथांबे उभारण्याची गरज | पुढारी

कुरकुंभ चौकात सुसज्ज बसथांबे उभारण्याची गरज

कुरकुंभ(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ (ता. दौंड) चौकातून वेगवेगळ्या गावी जाण्यासाठी एसटी बसथांबे आहेत. मात्र, या ठिकाणी शेड, बाकडे, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि इतर सुविधांची वानवा आहे. त्यामुळे प्रवाशांना ऊन, वारा, पावसाचा त्रास सहन करीत बसची वाट बघत थांबावे लागत आहे. चौकात चारही ठिकाणी सुसज्ज सोय असलेले बसथांबे उभारावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. कुरकुंभ गावातून पुणे-सोलापूर, मनमाड-बेळगाव हे दोन राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. येथील मुख्य चौकात दोन्ही महामार्ग एकत्र येतात. या ठिकाणाहून दौंड, पुणे, सोलापूर, बारामती या ठिकाणी जाणारी शाळकरी मुले, कामगार, व्यापारी, नोकरदार तसेच शेतकरीवर्गाची मोठी वर्दळ असते.

पुणे व बारामतीकडे जाणारे प्रवासी ओढ्यालगतच्या सेवा रस्त्यावर थांबतात. सोलापूरकडे जाणारे प्रवासी श्री फिरंगाई देवी मंदिराकडे जाणार्‍या सेवा रस्त्यावर उभे राहतात, तर दौंडकडे जाणारे प्रवासी कुरकुंभ-दौंड रस्त्यावर उभे असतात. या चारही बसथांब्यांवर सर्व एसटी बस थांबतात. या ठिकाणी एसटीचे बसथांबे दिलेले आहेत. मात्र, ते विनाशेडचे असून, केवळ नाममात्र नेमून दिलेली ठिकाणे आहेत.

या ठिकाणी दररोज शेकडो प्रवाशांची गर्दी असते. मात्र, यापैकी एकाही थांब्याला ना शेड आहे, ना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था. पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह तर लांबचीच गोष्ट. या ठिकाणी कोणतीच व्यवस्था प्रवाशांसाठी नाही. केवळ बसची वाट बघत प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. उन्हाळ्यात प्रवाशांना उन्हाचे चटके सोसावे लागतात. पावसाळ्यात पाऊस व वार्‍याचा सामना करावा लागतो.

अनेक प्रवासी बसण्यासाठी किंवा उभे राहण्यासाठी आजूबाजूच्या दुकानांचा आधार घेतात. पुणे-सोलापूर महामार्गावर जे बसथांबे आहेत. ते सोयीचे नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. प्रवासी एका ठिकाणी, बसथांबे दुसर्‍या ठिकाणी, अशी अवस्था आहे. कुरकुंभमधून दोन्ही राष्ट्रीय महामार्ग गेले असले तरी बसथांब्यांबाबत विचार केला नाही. जागेअभावी बहुतांश एसटी बस रस्त्यावर उभ्या करून प्रवाशांची चढ-उतार केली जाते. यादरम्यान वाहतूक कोंडी होते. प्रशासनाने प्रवाशांच्या सोईच्या ठिकाणी सर्व सुविधांयुक्त बसथांब्याची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे स्थानिकांसह प्रवासी सांगत आहेत.

Back to top button