पुणे: शिरूरमधून लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून खा. अमोल कोल्हेच, विलास लांडे यांचाही दावा | पुढारी

पुणे: शिरूरमधून लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून खा. अमोल कोल्हेच, विलास लांडे यांचाही दावा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे २०२४ ची लोकसभा निवडणुक राष्ट्रवादीकडून लढणार की भाजपकडून, याबाबत काही दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात असतानाच खा. कोल्हे यांनी आपण राष्ट्रवादीकडून निवडणुक लढवण्यास तयार असल्याचे सोमवारी राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांना सांगितले. मतदारसंघातील आमदार व पदाधिकाऱ्यांनीदेखील खा. कोल्हे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी यावेळी केल्याने कोल्हे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शिरूर, जालना आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक झाली. या बैठकीस राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आदी उपस्थित होते.

शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी खासदार कोल्हे, आमदार चेतन तुपे, आ. अतुल बेनके यांच्यासह शिरूर मतदारसंघातील आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत माजी आमदार विलास लांडे यांनी लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. मतदारसंघातील इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मत व्यक्त करताना खा. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्याची भूमिका मांडली.

सर्वांची मते ऐकून घेतल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खा. अमोल कोल्हे यांना आपण निवडणूक लढण्यास तयार आहात का ? असा थेट प्रश्न विचारला. त्यावर कोल्हे यांनी पक्ष सांगेल ती भूमिका मान्य असेल, असे उत्तर दिले. त्यावर देखील अजित पवारांनी तुमचे मत काय ते, स्पष्टपणे सांगा, असे म्हंटले. त्यावर कोल्हे यांनी मी पक्षाकडून निवडणूक लढविण्यास तयार आहे, असे स्पष्ट केले. यावेळी शरद पवार यांनी देखील कोल्हे यांच्या उमेदवारीला होकार दर्शविला.

Back to top button