मोशी उपबाजारात कांदा, बटाटा, भेंडी यांची आवक वाढली | पुढारी

मोशी उपबाजारात कांदा, बटाटा, भेंडी यांची आवक वाढली

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मोशी उपबाजारात गेल्या आठवड्यापेक्षा रविवारी (दि. 4) भेंडीची आवक चांगली झाली. तर, काकडीची आवक काही प्रमाणात घटली. कांदा आणि बटाटा यांची आवक वाढली आहे. भेंडीच्या दरात पिंपरी येथील भाजी मंडईमध्ये किरकोळ दरामध्ये प्रति किलोमागे 10 ते 20 रुपये तर, काकडीच्या दरात प्रति किलोमागे 10 रुपये इतकी वाढ झाली आहे.

पिंपरी भाजी मंडईत कोबी आणि फ्लॉवरची आवक चांगली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या दरात जास्त वाढ झालेली नाही. सिमला मिरची, पावटा, घेवडा, शेवगा यांची आवक कमी झाली आहे. तर, ढोबळी मिरचीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. सध्या ढोबळी मिरचीचा किरकोळ दर प्रति किलो 70 ते 80 रुपये इतका सुरू आहे. उन्हामुळे फळभाज्यांची आवक कमी होत असली तरी सध्या जून महिना सुरु झाला आहे. त्यामुळे सतत पाऊस सुरू झाल्यानंतर फळभाज्या स्वस्त होतील, अशी माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली.
कांदा, बटाट्याची आवक वाढली

मोशी उपबाजारात कांदा आणि बटाट्याची आवक वाढली आहे. गेल्या आठवड्यात 375 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्या तुलनेत रविवारी 431 क्विंटल म्हणजे गेल्या आठवड्याच्या तुलनेत 56 क्विंटल कांद्याची जास्त आवक झाली आहे. गेल्या आठवड्यामध्ये बटाट्याची फक्त 334 क्विंटल इतकी आवक झाली होती. तर, रविवारी दुपटीपेक्षा अधिक म्हणजेच 912 क्विंटल इतकी आवक झाली.

घाऊक बाजारात कांद्याच्या दरात क्विंटलमागे 150 रुपये वाढ तर, बटाट्याच्या दरामध्ये क्विंटलमागे 50 रुपयांची घट झाली आहे.
मोशी उपबाजारात रविवारी फळभाज्यांची एकूण 3029 क्विंटल तर, फळांची 230 क्विंटल इतकी आवक झाली. त्याचप्रमाणे, 34 हजार 900 गड्ड्या इतकी पालेभाज्यांची एकूण आवक झाली.

Back to top button