खासगी बस रात्री चक्क कुठेही थांबतात ! हडपसर परिसरातील स्थिती | पुढारी

खासगी बस रात्री चक्क कुठेही थांबतात ! हडपसर परिसरातील स्थिती

हडपसर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर मार्गावर हडपसर परिसरात रात्रीच्या वेळी खासगी बसचालक वाटेल तिथे थांबे घेत असल्याने वाहतूक कोंडी होत असून, अपघात होण्याचीही शक्यता आहे. वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना इतर वाहनचालक व नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. खासगी बसच्या या अनधिकृत थांब्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

हडपसर येथे सोलापूर महामार्ग हा वर्दळीचा असून, त्यावर वाहतूक कोंडी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यातच रात्री आठ ते बारा या वेळीत खासगी बसचालक प्रवाशी घेण्यासाठी कुठेही थांबत आहेत. यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत आणखी भर पडत आहे. यामुळे छोटे, मोठे अपघातही होत आहेत.

खासगी बसला दुसरीकडे थांबे देण्यात यावेत, रस्त्यावर उभ्या राहणार्‍या बसवर नियमित कारवाई करावी, या वाहतुकदारांनी बस थांब्यांसाठी वैयक्तिक मालकीची जागा भाड्याने घ्यावी, यासह विविध उपाययोजनांवर पोलिस, लोकप्रतिनिधी व तज्ज्ञांच्या बैठकीत वारंवार चर्चा झाली आहे. मात्र, या उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याने या बस मुख्य रस्त्यावर उभ्या केल्या जात आहेत. याला प्रशासन जबाबदार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

मगरपट्टा चौक, सावली कॉर्नर, आर्यन सेंटर, गाडीतळ पीएमपी बिल्डिंग, हॉटेल प्रणाम समोर, रविदर्शन, हडपसर आकाशवाणी, पंधरा नंबर चौकाच्या अलीकडे या बस उभ्या केल्या जात असल्याने रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागत आहेत. या चौकांमध्ये असलेल्या सिग्नलच्या पुढे किंवा मागे या बस थांबत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

पोलिस म्हणतात नियमित कारवाई…

अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांसह खासगी बसवर देखील दररोज कारवाई केली जात आहे. मनो पार्किंगफमध्ये उभ्या राहणार्‍या वाहनचालकांकडून दंड वसूल केला जात आहे. खासगी बस मुख्य रस्त्यावर थांबू नये, याबाबत संबंधित वाहतूकदारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळी थांबणार्‍या बससह इतर वाहनांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे हडपसर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी सांगितले.

मगरपट्टा चौक ते पंधरा नंबरपर्यंत खासगी थांबत आहेत. त्यामुळे रात्री वाहतूक कोंडी होत आहे. या बसला आकाश लॉन्स चौकाच्या पुढे व लोणी काळभोर टोलनाक्याजवळ किंवा त्यापुढे डाव्या बाजूला थांबा केला, तर वाहतूक कोंडी आणि अपघातही कमी होतील.

-गुरू पवार, रहिवासी, हडपसर.

खासगी बस रस्त्यावर व सोसायट्यांलगत थांबत असल्याने प्रवाशी रात्रीच्या कुठेही लघुशंका करतात. यामुळे या भागात दुर्गंधी पसरून अस्वच्छता निर्माण होत असल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. त्या बसमधील प्रवासी प्लॉस्टिकच्या बाटल्या व कचरा या भागात टाकत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत.

-दिलीप गायकवाड, रहिवासी, हडपसर.

Back to top button