पुणे : कोंडीत अडकली रुग्णवाहिका; सारसबाग चौकात सिग्नल बंद | पुढारी

पुणे : कोंडीत अडकली रुग्णवाहिका; सारसबाग चौकात सिग्नल बंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वाहतूक सिग्नल यंत्रणा रविवारी अचानक बंद पडल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली. या कोंडीत रुग्णवाहिका अडकली. त्या वेळी एका पीएमपीएमएल बसवाहकाने वाहतूक मोकळी करून रस्ता मोकळा केला. एरवी सारसबाग चौकात ‘कर्तव्य’ बजावणारे वाहतूक पोलिस सिग्नल बंद असताना गायब होते. काही वेळातच चौकात दाखल होत, एका वाहतूक पोलिसाने वाहतूक सुरळीत केली. रविवारी सायंकाळी अचानक वाहतूक सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने सारसबाग चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा फटका एका रुग्णवाहिकेला बसला. विशेष म्हणजे दररोज खंडोबा मंदिरासमोर घोळक्याने कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलिस सिग्नल बंद असतानाही वाहतूक नियंत्रण करण्यासाठी चौकात कोणीच नसल्याचे दिसून आले.

स्वारगेटकडून सारसबागेकडे येणार्‍या आणि सिंहगड रस्त्यावरून येणारी वाहने चौकात एकमेकासमोर येऊन थांबली होती. या वेळी कोंडीची परवा न करता प्रत्येकामध्ये पुढे जाण्याची स्पर्धा लागली होती. या गोंधळात स्वारगेटकडून येणार्‍या मार्गावर सारसबागेसमोर रुग्णवाहिका अडकली. पुढे जाण्यासाठी चालक सायरन वाजत होता. परंतु, चौकात कोंडी असल्याने वाहनांना पुढे जाता येत नव्हते. त्याचवेळी सिग्नलला उभ्या असलेल्या पीएमपीएमएलच्या वाहक बसमधून उतरून चौकातील वाहतूक कोंडी सुरळीत केली. दरम्यान, काही वेळात एक वाहतूक पोलिस चौकात दाखल होत त्याने वाहतूक तत्काळ सुरळीत केली.

Back to top button