पुणे : सात हजार परीक्षार्थींची राज्यसेवा पूर्वपरीक्षेला दांडी! | पुढारी

पुणे : सात हजार परीक्षार्थींची राज्यसेवा पूर्वपरीक्षेला दांडी!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीव्दारे घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा रविवारी पुणे जिल्ह्यात सुरळीत पार पडली. परंतु, नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी तब्बल सात हजार परीक्षार्थींनी परीक्षेला दांडी मारली आहे. पुणे जिल्ह्यात एमपीएससी पूर्वपरीक्षेसाठी 39 हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 32 हजार स्पर्धा परीक्षार्थींनी विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली, तर 7 हजार परीक्षार्थी गैरहजर असल्याचे दिसून आले. पुणे जिल्ह्यातील 97 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.

त्यापैकी 90 केंद्रे पुणे शहरात, तर अन्य केंद्रे पुरंदर आणि खेड हद्दीत होते. राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत 673 पदांच्या भरतीकरिता एमपीएससीतर्फे संबंधित परीक्षा घेण्यात आली. यामध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या गट ’अ’ आणि गट ’ब’ची 295 पदे आहेत, तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी 130 पदे, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी 15 पदे, अन्न व नागरी विभागाच्या वैधमापन शास्त्र विभागाची निरीक्षकाची 39 पदे, तर अन्न व औषध प्रशासकीय सेवेतील 194 पदांचा समावेश आहे.

आता याच पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा 7 ते 9 ऑक्टोबरदरम्यान होणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. कोणताही अनुचित प्रकार न होता चांगल्या पद्धतीने राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुणे जिल्ह्यात दोन सत्रांत पार पडली, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले.

राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2023 रविवारी आमच्या केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली. परंतु, आमच्या खोलीमध्ये पंखे बंद पडल्यामुळे परीक्षार्थींना उकाडा सहन करावा लागला. ज्या ठिकाणी परीक्षा होणार आहे, तेथील प्रशासनाने पूर्वतयारी करून स्पर्धा परीक्षार्थींना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. नवीन अभ्यासक्रमासाठी दोन वर्षे तयारीला वेळ दिल्यामुळे परीक्षार्थी मोठ्या प्रमाणावर परीक्षेला हजर दिसत होते.

– महेश घरबुडे, स्पर्धा परीक्षार्थी

Back to top button