पिंपरी : जामिनावर असलेल्या आरोपीकडून पिस्तूल जप्त | पुढारी

पिंपरी : जामिनावर असलेल्या आरोपीकडून पिस्तूल जप्त

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खूनप्रकरणातील गुन्ह्यात जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या आरोपीकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने ही कारवाई केली. उमेश चंद्रकांत केदारी (27, रा. कोयतेवस्ती, पुनावळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध शस्त्रे विक्री करणारे व अवैध शस्त्रे बाळगणार्‍यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर पिंपरी -चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाचे पोलिस अधिकारी व कर्मचारी हे शुक्रवारी (दि. 2) पुनावळे परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी उमेश केदारी हा कोयतेवस्ती, पुनावळे हा अवैध शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, गुंडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी पुनावळे येथील कोयतेवस्ती चौक येथून उमेश केदारी याला ताब्यात घेतले.

त्याच्या कब्जातून 51 हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल मॅग्झीनसह व दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 5 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरिश माने, पोलिस अंमलदार – विक्रम जगदाळे, नितीन गेंगजे, रामदास मोहिते यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

कामशेत खूनप्रकरणात केली होती अटक

आरोपी उमेश केदारी याच्या विरोधात पुणे ग्रामीणच्या कामशेत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सध्या तो जामिनावर बाहेर आला होता. वारी व्यवस्थापक

Back to top button