मुंढवा : सुविधांची हमी मिळेपर्यंत जागा देणार नाही; भीमनगर येथील रहिवाशांची भूमिका | पुढारी

मुंढवा : सुविधांची हमी मिळेपर्यंत जागा देणार नाही; भीमनगर येथील रहिवाशांची भूमिका

मुंढवा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भीमनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) यापूर्वी उभारलेल्या इमारतीमधील रहिवाशांना अद्यापही आवश्यक सुविधा मिळत नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नव्याने उभारणात येणार्‍या इमारतीत प्रशासानाकडून सुविधा मिळण्याची हमी मिळत नाही तोपर्यंत आम्ही जागा खाली करणार नाही, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली.

भीमनगर येथे ‘एसआरए’तर्फे एक इमारत उभारण्यात आली असून, दुसरी इमारत उभारण्यात येत आहे. यासाठी जागा देण्यास रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत ‘एसआरए’च्या अधिकारी व नागरिकांच्या बैठका होऊन तोडगा निघाला नाही. या पार्श्वभूमीवर मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे व अधिकार्‍यांनी रहिवाशांचे प्रश्न नुकतेच जाणून घेतले. या वेळी नागरिकांनी विविध समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला. हे प्रश्न ‘एसआरए’च्या वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत पोहचवून याबाबत मार्ग काढण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी नागरिकांना दिले.

या ठिकाणी एसआरएच्या दुसर्‍या इमारतीचे काम सुरू आहे. इमारतीच्या कामासाठी जागा खाली करा, म्हणून येथील रहिवाशांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र, नवीन इमारतीमध्ये आम्हाला आवश्यक त्या सुविधा मिळणार नसतील, तर आम्ही आमचे आहे ते घर खाली करून काय उपयोग, असा प्रश्न या वेळी नागरिकांनी उपस्थित केला आहे. ‘नवीन इमारतीमध्ये आम्हाला आवश्यक सुविधा मिळण्याची लेखी हमी जोपर्यंत दिली जात नाही तोपर्यंत आम्ही घरे खाली करणार नाही,’ असे येथील नागरिकांनी पोलिसांना सांगितले. सोनू काकडे, आनंद उघडे, रोहन सरोदे व सुरज नाईकनवरे आदींसह नागरिक या वेळी उपस्थित होते.

सुविधांचा अभाव अन् नागरिकांत संताप

भीमनगर येथे ‘एसआरए’ची एक इमारत बांधून पूर्ण झाली आहे. मात्र, या इमारतीत पिण्याचे पाणी चार-चार दिवस येत नाही. लिफ्टही वारंवार बंद पडते. वीजपुरवठा नादुरुस्त झाला, तर तो लवकर पूर्ववत होत नाही. एसटीपी प्लँटचे पाणी अनधिकृतपणे बाहेर सोडले जाते. अनेक घरांच्या स्वच्छतागृहांमध्ये गळती होत आहे. तसेच कचराही वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिकांनी या वेळी संताप व्यक्त केला.

भीमनगर येथील रहिवाशांसोबत आमच्या तीन बैठका झाल्या आहेत. आम्ही नागरिकांच्या प्रश्नांविषयी ‘एसआरए’च्या अधिकार्‍यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच नागरिकांनीदेखील आपल्या समस्या ‘एसआरए’च्या अधिकार्‍यांसमोर मांडणे गरजेचे आहे.

                              – अजित लकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे

Back to top button