पुणे : शिवछत्रपती पुरस्काराचा चेंडू शासनाच्या ‘कोर्टा’त | पुढारी

पुणे : शिवछत्रपती पुरस्काराचा चेंडू शासनाच्या ‘कोर्टा’त

सुनील जगताप

पुणे : राज्य शासनाच्या वतीने ‘शिवछत्रपती’ राज्य क्रीडा पुरस्कारांची यादी दोन आठवड्यांपूर्वी जाहीर करण्यात आली आहे. या यादीवर काही हरकती आल्या असून, त्याचा निर्णय प्रलंबित आहे. ‘शिवछत्रपती’ पुरस्काराची अंतिम यादी जाहीर करण्याबाबतचा चेंडू आता शासनाच्या कोर्टात गेला आहे. शासनाच्या वतीने उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, जिजामाता पुरस्कार, राज्य साहसी क्रीडा, संघटक-कार्यकर्ते, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू) आणि जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश असतो.

जाहीर करण्यात आलेल्या प्रत्येक वर्षाच्या आणि प्रत्येक खेळातील नावांवर हरकत घेण्यासाठी शासनाकडून सात दिवसांची मुदत होती. क्रीडा विभागाला तब्बल 195 सूचना व हरकती प्राप्त झाल्या असून, त्याचा अहवाल शासनाकडे गेल्याचे क्रीडा अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, कोणत्याही वर्षाच्या कोणत्या नावावर हरकत आली आहे, याबाबत मात्र क्रीडा विभागाकडून खुलासा झालेला नाही. परंतु, तीन ते चार चांगल्या सूचना आल्या आहेत. या सूचनांचा सविस्तर अहवाल मान्यतेसाठी शासनाकडे पाठविल्याचे क्रीडा अधिकार्‍यांनी दै. ’पुढारी’शी बोलताना सांगितले.

शासनाच्या वतीने दोन आठवड्यांपूर्वी ‘शिवछत्रपती’ पुरस्काराची यादी जाहीर झालेली आहे. त्यामध्ये 2019-20, 2020-21 आणि 2021-22 अशी तीन वर्षांची यादी आहे. यामधील नावांवर हरकती घेण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार तब्बल 195 जणांच्या हरकती प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये दोनवेळा एकच हरकत, तर काही सूचनांचाही समावेश आहे.

– डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

Back to top button