रिक्षाचालकाने घेतला प्रवाशाच्या कानाचा चावा; पुण्यातील प्रकार | पुढारी

रिक्षाचालकाने घेतला प्रवाशाच्या कानाचा चावा; पुण्यातील प्रकार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रिक्षा भाड्याच्या कारणातून झालेल्या वादात एका प्रवाशाला रिक्षाचालकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर दाताने चावा घेऊन त्याच्या कानाचा लचकाच तोडला. संतोष चव्हाण (वय 41,रा. अलिबाग, रायगड) असे जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. या प्रकरणी रिक्षाचालकाच्या विरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. ही घटना गुरुवारी (दि.1) पहाटे एकच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकाजवळील सातारा रोडजवळील रिक्षा थांब्याजवळ घडली. याबाबत चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण हे खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करतात. ते त्यांच्या मूळगावी अलिबाग येथे जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानक परिसरात आले होते. त्यावेळी एका रिक्षाचालकासोबत त्यांचा भाड्याच्या कारणातून वाद झाला. त्या वेळी तेथील काही रिक्षाचालकांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, वाद झालेल्या रिक्षाचालकाने त्यांच्या कानाचा चावा घेऊन लचका तोडला. चव्हाण यांनी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार रिक्षाचालकाचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कारके करीत आहेत.

Back to top button