पुणे: जिल्ह्यात रब्बीची 56 टक्के पेरणी, कृषी अधीक्षक सुभाष काटकर यांची माहिती

पुणे: जिल्ह्यात रब्बीची 56 टक्के पेरणी, कृषी अधीक्षक सुभाष काटकर यांची माहिती

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र 2 लाख 29 हजार 712 हेक्टरइतके आहे. त्यापैकी 12 डिसेंबरअखेरच्या अहवालानुसार 1 लाख 29 हजार 360 हेक्टरवर म्हणजे 56 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष काटकर यांनी दिली. गहू, हरभर्‍याचा पेरा आणखी वाढण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

चालूवर्षी झालेल्या सततच्यामुळे जिल्ह्यात पाणी उपलब्धता चांगली आहे. त्यामुळे गहू आणि हरभरा पिकाखालील क्षेत्र वाढण्याची अपेक्षा आहे. रब्बी पिकांच्या पेरण्यासाठी कृषी विभागाने बि-बियाणे, खते आदी निविष्ठांच्या उपलब्धतेचे चांगले नियोजन केल्यामुळे शेतकर्‍यांना वेळेत पुरवठा होऊ शकला आहे. रब्बी पिकांशिवाय जिल्ह्यात चारापिकाखालील क्षेत्रातही वाढ होत आहे. सद्यस्थितीत 32 हजार 244 हेक्टरवर चारा पिके घेण्यात आलेली आहेत. तसेच भाजीपाला पिकांखालील क्षेत्र 3 हजार 822 हेक्टरइतके असल्याचेही काटकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पिकनिहाय पेरण्यांबाबत माहिती देताना कृषी उप संचालक प्रमोद सावंत म्हणाले, ज्वारी पिकाखालील क्षेत्र 1 लाख 34 हजार 336 हेक्टरइतके आहे. प्रत्यक्षात 74 हजार 647 म्हणजे 56 टक्क्यांइतक्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

गव्हाचे सरासरी क्षेत्र 39 हजार 803 हेक्टर असून 21 हजार 370 म्हणजे 54 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. मका पिकाखालील क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. मक्याचे 16 हजार 947 हेक्टरपैकी 14 हजार 721 हेक्टरइतके म्हणजे 87 टक्क्यांइतकी पेरणी पूर्ण झाली आहे.

हरभर्‍याचे सरासरी क्षेत्र 34 हजार 330 हेक्टर असून त्यापैकी 45 टक्के म्हणजे 15 हजार 458 हेक्टरवरील पेरा पूर्ण झालेला आहे. ऊस पिकाच्या काढणीनंतर गहू आणि हरभर्‍याच्या पेरणीसही शेतकरी प्राधान्य देतात. त्यामुळे या दोन्हींचे क्षेत्र आणखी वाढण्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news