पंतप्रधान मोदी ‘संन्यस्त कर्मयोगी’ : खासदार प्रकाश जावडेकर | पुढारी

पंतप्रधान मोदी ‘संन्यस्त कर्मयोगी’ : खासदार प्रकाश जावडेकर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा देशातील नागरिकांच्या मनात ‘देश प्रथम’, सतत कष्ट आणि शासकीय योजनांचा जात, पंत, धर्म न पाहता सर्वांना लाभ देणारे नेते, अशी निर्माण झाली आहे. ते ‘संन्यस्त कर्मयोगी’ असल्याने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील,’ असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री, खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नऊ वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार जावडेकर यांनी शुक्रवारी पुणे शहर भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कामाची माहिती दिली.

या वेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस व माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी उपस्थित होते. जावडेकर म्हणाले की, ‘गेली नऊ वर्षे पंतप्रधान मोदी यांनी जनतेचा विश्वास कमावला. हा विश्वासच आमची ताकद आहेत. याच ताकदीवर 2024 साली लोकसभेत भाजपला 350 हून अधिक, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) 400 हून अधिक जागा मिळतील. मोदींच्या नेतृत्वात देशात नऊ वर्षे सरकारने जात, धर्म, पंथ न मानता ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ यावर भर दिला.

गेल्या नऊ वर्षांत देशात कुठेही बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले झाले नाहीत. दीडशे जिल्ह्यांतील नक्षलवादी फक्त दीड जिल्ह्यापुरतेच उरले. कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील दगडफेक थांबली आणि प्रगती सुरू झाली. कोविडकाळात संपूर्ण देशाला मोफत डोस देऊन जगालाही लस पुरवली. जगातील विकसित देशांपेक्षा भारताला महागाई दर कमी ठेवण्यात यश आले आहे. देशात नवनवे महामार्ग, रस्ते, विमानतळ, जलवाहतूक मार्ग, मेट्रो प्रकल्प, वंदे भारत रेल्वे, बंदरांची निर्मिती, यामुळे देशाच्या विकासाला गती मिळाली आहे,’ असेही खा. जावडेकर यांनी नमूद केले.

रशिया-युक्रेन युद्धसमाप्तीनंतर किमतीवरील परिणाम दिसेल

देश वेगाने प्रगती करीत असताना गॅस, पेट्रोल, डिझेल या इंधनाचे दर 2014 पूर्वीप्रमाणे होणार का? यावर बोलताना जावडेकर म्हणाले की, आपण इंधन आयात करतो. आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर इंधनाचे दर ठरतात. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे इंधनाचे दर वाढलेले दिसत आहेत. हे युद्ध थांबावे, यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. युद्ध थांबल्यानंतर इंधनदरावरील परिणाम दिसून येतील, असा विश्वास खासदार जावडेकर यांनी या वेळी व्यक्त केला.

Back to top button