पुणे : पुनर्परीक्षेसाठी 86 हजार विद्यार्थी पात्र | पुढारी

पुणे : पुनर्परीक्षेसाठी 86 हजार विद्यार्थी पात्र

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये 86 हजार 594 विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी, तर 33 हजार 306 विद्यार्थी एटीकेटीसाठी पात्र असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे. दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणी सुधारू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 जूनपासून सुरू होणार आहे.

पुनर्परीक्षेसाठी पुणे (11040), नागपूर (10826), औरंगाबाद(10145), मुंबई (21215), कोल्हापूर (3766), अमरावती (9768), नाशिक (12460), लातूर (6940), कोकण (434) अशा 86 हजार 594 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर एटीकेटीमध्ये पुणे (4433), नागपूर (3538), औरंगाबाद (4327), मुंबई (7996), कोल्हापूर (1394), अमरावती (3326), नाशिक (5236), लातूर (2805), कोकण (251) अशा 33 हजार 306 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संबंधित विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या वतीने जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा देता येणार आहे.

95 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव

दहावीच्या जाहीर करण्यात आलेल्या निकालात 95 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. यामध्ये पुणे (1), नागपूर (2), औरंगाबाद (25) व मुंबई (67) विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर मुंबईमधील 3 विद्यार्थ्यांना डिबार करण्यात आले आहे.

दहावीसाठी यंदा 23 ट्रान्सजेंडर

दहावीच्या परीक्षेसाठी यंदा 23 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये पुणे (7), नागपूर (3), औरंगाबाद (2), मुंबई (9) व
लातूर (2) विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Back to top button