इंदापूर : विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ट्रॉलीला आग | पुढारी

इंदापूर : विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ट्रॉलीला आग

इंदापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वीजवाहक तारांना घर्षण होऊन लागलेल्या आगीत जनावरांचा चारा वाहतूक करणार्‍या दोन्ही ट्रेलर चार्‍यासह जळून खाक झाले. ही घटना माळवाडी नंबर एक (ता. इंदापूर) येथे गुरुवारी (दि. 1) घडली. आग लागताच वाहनचालकाने तत्काळ सावधगिरी बाळगत दोन्ही ट्रॉल्यांना जोडलेला ट्रॅक्टर बाजूला केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेत पिंपरी खुर्द येथील शेतकरी कुबेर पवार यांचं मोठे नुकसान झाले.

कुबेर पवार हे बाभुळगाव येथून दोन्ही ट्रॉलीमध्ये जनावरांना चारा भरून पिंपरी खुर्द येथे निघाले होते. रात्री माळवाडी नंबर एक गावात रस्त्यावरील विजेच्या तारांना घर्षण झाले. त्यामुळे आग लागून दोन्ही ट्रॉली आणि चारा जळून खाक झाला. इंदापूर नगर परिषद व कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन यंत्राच्या मदतीने आग विझवण्यात आली.

Back to top button