बारामती दूध संघाच्या निवडीत तावरेंची पाटी कोरीच! | पुढारी

बारामती दूध संघाच्या निवडीत तावरेंची पाटी कोरीच!

सांगवी (पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असली तरी संघाच्या इतिहासात प्रथमच बारामती तालुक्यात राजकारणात सक्रिय असलेल्या तावरे आडनावाला राष्ट्रवादी काँग्रेसने संचालकांची यादी करताना डावलल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम आहे. पक्षाच्या वतीने शुक्रवारी ( दि. 2 ) संचालक मंडळाची यादी जाहीर केली.

या यादीत संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत कोणत्या ना कोणत्या तावरे आडनावाच्या व्यक्तींना दूध संघाच्या संचालक मंडळात संधी दिली जात होती. परंतु 2023 ते 28 या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या यादीत यंदा प्रथमच तावरेंच्या आडनावाची पाटी कोरीच ठेवण्यात आली असल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. संघाच्या संचालक मंडळाच्या यादीत तावरे आडनावाच्या व्यक्तींना संधी मिळाली नाही ही संघाच्या इतिहासातील पहिलीच घटना मानली जात आहे.

पूर्वी माजी केंद्रीय मंत्री व खा. शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार व खा. सुप्रिया सुळे यांच्या राजकीय घडामोडी या बारामती दूध संघाच्या इमारतीतून चालत असत. संघाच्या स्थापनेपासून सांगवी, माळेगाव, पाहुणेवाडी, माळेगाव खुर्द, मोरगाव आंबी या गावांतील कोणी ना कोणीतरी तावरे आडनावाच्या व्यक्ती संचालक मंडळात असायच्या. या संघाच्या यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकाही तावरे आडनावाच्या व्यक्तीचा संचालक मंडळात समावेश झाला नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बारामती दूध संघाचे 193 मतदार संस्था प्रतिनिधी आहेत. त्यापैकी 132 जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याचे समजते आहे. त्यात पक्षाकडे मागणी करणार्‍या तावरे आडनावाच्या इच्छुकांची संख्या कमी नव्हती. वरीलपैकी एकाही गावातील तावरे आडनावाच्या व्यक्तींचा विचार केला पाहिजे होता; परंतु कशामुळे या आडनावाची पक्षनेतृत्वाने दखल घेतली नाही याबाबत दबक्या आवाजात चर्चा होताना दिसत आहे.

Back to top button