पुणे : कुसुम सौरपंप योजनेसाठी 88 हजार अर्ज | पुढारी

पुणे : कुसुम सौरपंप योजनेसाठी 88 हजार अर्ज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्य शेतकर्‍यांसाठी वरदान ठरू शकेल अशी सौरपंप योजना राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. महाऊर्जाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या योजनेसाठी आतापर्यंत तब्बल 88 हजार शेतकर्‍यांना ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. आता सौरपंपाचा कोटा राज्यासाठी एकच ठेवला आहे. हा कोटा शिल्लक असल्याने शेतकर्‍यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अद्यापही ऑनलाइन अर्ज करताना शेतकर्‍यांना प्रचंड अडचणी येत असून, त्या दूर करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

महाऊर्जामार्फत 17 मे 2023 पासून पंतप्रधान कुसुम सौरपंप योजनेचे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. एकाचवेळी असंख्य शेतकरी अर्ज करण्याच्या प्रयत्नात असल्याने प्रक्रिया होण्यास विलंब होत आहे. तरी सर्व शेतकर्‍यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेतला जात असल्याचे महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, अजूनही शेतकर्‍यांना ऑनलाइन अर्ज दाखल करताना प्रचंड अडचणी येत आहे.

कोणत्या जिल्ह्याचा कोटा किती शिल्लक आहे, अर्ज करताना दोन-तीन वेळा शुल्काची वजा झालेली रक्कम पुन्हा शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होत नाहीत, शुल्क वजा झाले तरी ओटीपी येत नाही, अर्ज पूर्ण भरला गेला नसताना तुमचे रजिस्ट्रेशन यापूर्वीच झाले आहे. यासारख्या अनेक अडचणी येत आहेत. या सर्व अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.

योजनेचा लाभ घ्यावा

महाऊर्जामार्फत सुरू केलेल्या ऑनलाइन पोर्टलचा लाभ सर्व शेतकर्‍यांनी घ्यावा. प्रधानमंत्री कुसुम सौरपंप योजनेसाठी कुठलीही अंतिम मुदत नसून शेतकर्‍यांचे अर्ज प्राप्त होईपर्यंत संकेतस्थळ सुरू असणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी संयम ठेवून योजनेचा लाभ घ्यावा. ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करताना येणार्‍या अडचणींसाठी 020-35000456 किंवा 020-35000457 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवू शकता, असे जगताप यांनी सांगितले.

Back to top button