कोकणसह मराठवाडा, प. महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज | पुढारी

कोकणसह मराठवाडा, प. महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात यंदा सरासरीच्या 95 टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. यामध्ये पाच टक्के कमी-अधिक तफावत आढळून येण्याचा अंदाज आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातही कमी पाऊस होण्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ व कृषी हवामान फोरम साऊथ एशियाचे संस्थापक सदस्य डॉ. रामचंद्र साबळे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीचा दीर्घकालीन पावसाचा अंदाज जाहीर करताना डॉ. साबळे म्हणाले, हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वार्‍याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. कोकणात 94 टक्के पाऊस होईल, असा अंदाज आहे. त्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात 93.5 टक्के पावसाची शक्यता असून ती सरारीपेक्षा कमी आहे.

यंदाच्या पावसाळ्यात राज्यात 95 टक्के पावसाचा अंदाज असून, यामध्ये पूर्व विदर्भ व मध्य विदर्भ विभागात शंभर टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित अनेक भागात पावसाचा खंड पडेल. जून महिन्यात कमी पाऊस आहे. त्यामुळे खरिपात शेतकर्‍यांनी 65 मिलिमीटर पाऊस व पुरेसा ओलावा झाल्याशिवाय पेरणी करू नये. यशिवाय धूळवाफ पेरणीही करू नये. काही प्रमाणात पाणीटंचाई भासण्याची शक्यता असल्याने फळबाग उत्पादकांनी ठिबक सिंचनाने पाणी द्यावे, अशी सूचना डॉ. साबळे यांनी केली आहे.

राज्यात पाच दिवस उष्णतेची तीव्र लाट

राज्यात उष्णतेचा कडाका पुन्हा वाढला आहे. 5 जूनपर्यंत बहुतांश भागांत उष्णतेची तीव्र लाट येणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात ही लाट तीव्र असणार आहे. तर याच भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यात काही दिवस अशी दुहेरी स्थिती पाहण्यास मिळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, शुक्रवारी राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे 44.3 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले.

मान्सूनचे दक्षिण अरबी समुद्रात आगमन

मान्सूनची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली आगेकूच सध्या जोरदार सुरू असून, शुक्रवारी (दि. 2) मान्सूनने दक्षिण-पूर्व अरबी समुद्रासह मालदीव, लक्षव्दीप बेटांचा काही भाग, कॉमोरीनचा संपूर्ण भाग तसेच बंगालच्या उपसागरातील मध्य-पूर्व भाग व्यापला आहे. पोषक स्थितीमुळे मान्सूनची आगेकूच सुरूच राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, येत्या 48 तासांत दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे मान्सूनचा प्रवास थोडासा थांबण्याची शक्यता आहे.

Back to top button