कचरा वेचून मुलासोबत केला अभ्यास, मायलेकांनी दहावीत मिळवलं घवघवीत यश

पुणे : कमी वयात त्यांचे लग्न झाले…त्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही….शिक्षणाचे स्वप्न उराशी होतेच…पण, परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना कचरा वेचण्याचे काम करावे लागले… मुलाने शिकावे, यासाठी त्या कष्ट करीत होत्या…पण, त्याने आईला दहावीची परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले….दोघांनीही वर्षभर एकत्रित अभ्यास करून दहावीची परीक्षा दिली. आता या आई-मुलाच्या जोडीने एकत्रितपणे दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
ही कहाणी आहे आई मोनिका आणि मुलगा मंथन तेलंगे यांची. कचरावेचक असलेल्या मोनिका आणि मुलगा मंथन यांनी एकत्रितपणे दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली आहे. मोनिका यांनी 51.80 टक्के, तर मंथन याने 64.00 टक्के गुण प्राप्त केले आहेत. आम्ही एकत्रितपणे दहावी उत्तीर्ण झाल्याचा आनंद असल्याची भावना मंथनने व्यक्त केली.
मुलगा मंथनच माझा शिक्षक बनला आणि त्याने अभ्यासात मदत केली. मंथननेही खूप अभ्यास केला. एकत्रितपणे आम्ही दहावीची परीक्षा दिली. दहावीची परीक्षा आम्ही एकत्रितपणे उत्तीर्ण झाल्याचा आनंद आहे. मुलासोबत दहावी देऊन आनंद झाला. डॉक्टर बनू इच्छिणारा मंथन आता पुढच्या परीक्षेची तयारी करणार आहे. मला नर्सिंगचा कोर्स आणि बारावीची तयारी करायची आहे, असे मोनिका तेलंगे यांनी सांगितले.