पुणे : महापालिकेच्या 20 शाळांमध्ये उभारणार लॅब | पुढारी

पुणे : महापालिकेच्या 20 शाळांमध्ये उभारणार लॅब

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये यापूर्वी उभारलेल्या अ‍ॅस्ट्रॉनॉमी लॅब आणि सायन्स लॅबचा कोणताही लेखाजोखा शिक्षण विभागाकडे नाही. आता पुन्हा महापालिकेच्या 10 शाळांमध्ये अ‍ॅस्ट्रॉनॉमी लॅब आणि 10 शाळांमध्ये सायन्स लॅब उभारण्याच्या निविदा स्थायी समितीने मंजूर केल्या. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा साडेचार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
महापालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेत अ‍ॅस्ट्रॉनॉमी लॅबसाठी मे. त्रिमूर्ती इंजिनिअरिंगची निविदा, तर सायन्स लॅबसाठी मे. एज्युनीडस या कंपनीची निविदा सर्वात कमी दराने आल्याने त्यांना मान्यता देण्यात आली.

दोन्ही प्रकारच्या लॅबसाठी प्रत्येकी सव्वादोन कोटी रुपयांची तरतूद आहे. लॅब उभारण्याच्या शाळा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. त्यामुळे कामाचे आदेश दिलेले नाहीत. दरम्यान, महापालिकेच्या शाळांमध्ये यापूर्वी देखील सायन्स लॅब, अ‍ॅस्ट्रॉनॉमी लॅबसाठी लाखो रुपयांची साहित्य खरेदी झाली आहे. कोरोनापूर्वी अनेक शाळांमध्ये नगरसेवकांच्या निधीतून हे साहित्य खरेदी केले आहे. अनेक शाळांमध्ये हे साहित्य आजही पॅकबंद अवस्थेत पडून आहे.

यावर माध्यमांनी प्रकाश टाकल्यावर ही साहित्य खरेदी बंद करण्यात आली होती. आजवर या लॅबचा उपयोग विद्यार्थ्यांना किती झाला? शिक्षकांनी याचा उपयोग करून किती विद्यार्थ्यांना शिकविले? सध्या या साहित्यांची अवस्था काय? याचा कुठलाही लेखाजोखा शिक्षण विभागाकडे नाही. असे असताना यावर्षी फेब्रुवारीमध्ये जिल्हा नियोजन समितीकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीकरिता सायन्स लॅब आणि अ‍ॅस्ट्रॉनॉमी लॅबसाठी तब्बल 4 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने दाखविलेली गतिमानता आश्चर्यकारक आहे.

गतिमान कारभार

10 फेब्रुवारी 2023 – जिल्हा नियोजन समितीची 4.50 कोटी रुपये निधी देण्यास मान्यता.
10 फेब्रुवारी 2023 – महापालिका शिक्षण मंडळाचे निविदा प्रक्रिया राबविण्यास प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी पत्र.
13 फेब्रुवारी 2023 – सी.ओ.ई.पी. टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीची लॅबसाठीच्या साहित्याला तांत्रिक मान्यता.
13 फेब्रुवारी 2023- जिल्हा नियोजन समितीची प्रशासकीय मान्यता.
14 फेब्रुवारी 2023 – निविदा प्रसिद्ध

जिल्हा नियोजन समितीकडून आलेल्या पत्रानुसार सायन्स लॅब आणि अ‍ॅस्ट्रॉनॉमी लॅबसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली. प्रत्येकी 10 शाळांमध्ये अनुक्रमे सायन्स व अ‍ॅस्ट्रॉनॉमी लॅब सुरू करण्यात येतील. शाळा सुरू झाल्यानंतरच या शाळांची यादी जाहीर करण्यात येईल. यापूर्वी या स्वरूपाचे कधी आणि किती साहित्य खरेदी केलेे, याची माहिती शाळा सुरू झाल्यानंतर मिळू शकेल.

                                 – मीनाक्षी राऊत, शिक्षणप्रमुख, महापालिका शिक्षण मंडळ

Back to top button