पुण्यात सहायक फौजदाराच्या कानशिलात लगावली | पुढारी

पुण्यात सहायक फौजदाराच्या कानशिलात लगावली

पुणे, पुढारी वृत्तसेवा: विनाहेल्मेट दुचाकीस्वाराला थांबविल्यानंतर दुचाकीस्वाराने पोलिसांशी हुज्जत घालत गोंधळ घातला. एका मैत्रिणीला बोलवून घेतले. पोलिसांनी दोघांना ठाण्यात आणल्यानंतर दुचाकीस्वाराने अचानक सहायक फौजदाराच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार बिबवेवाडी पोलिस ठाण्यात घडला. पोलिसांनी गुन्हा नोंद करून दोघांना अटक केली.

याप्रकरणी पोरीष वालावकर (वय 29) आणि सुचेता चेतन घुले (वय 28, दोघे रा. चिंतामणी रेसिडेन्सी, बिबवेवाडी) यांना अटक केली आहे. याबाबत सहायक फौजदार रामदास बांदल (वय 57) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार रात्री साडेअकराच्या सुमारास रविवारी घडला.

बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या बाजूला विमल विहार सोसायटीजवळ रात्री नाकाबंदी लावण्यात आली होती. या वेळी तक्रारदार व सहायक पोलिस निरीक्षक बरडे व इतर सहकारी नाकाबंदी करीत होते. गौरव दुचाकीवरून विनाहेल्मेट जात होता, त्यामुळे त्याला पोलिसांनी अडवून आरसी बुक व वाहन परवाना मागितला. त्याने कोणतीही कागदपत्रे न दाखवता त्यांच्यासोबत हुज्जत घातली. त्यानंतर त्याने मैत्रीण सुचेता घुले हिला बोलावून घेतले. नंतर गौरव याला पोलिस ठाण्यात आणल्यावर त्याने अचानक बांदल यांच्या कानाखाली मारून आता काय करायचे ते करा, असे बोलून सरकारी कामात अडथळा आणला, असे तक्रारीत म्हटले आहे.

Back to top button