पुणे: मुलांना पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश, शिक्षणाधिकार्‍यांची माहिती | पुढारी

पुणे: मुलांना पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश, शिक्षणाधिकार्‍यांची माहिती

पुणे, पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना पहिल्या दिवशीच म्हणजेच 15 जून रोजी गणवेश मिळणार आहेत. अनेकदा गणवेश मिळण्यास कोणत्या ना कोणत्या कारणाने विलंब होतो. मात्र, हे टाळण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले असून, गणवेशासाठी 4 कोटी 85 लाख रुपयांचा निधी शाळांना वर्ग करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी रमाकांत म्हेत्रे यांनी दिली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. विविध उपक्रम राबविण्यात आले. परंतु, त्याचबरोबर गणवेश वेळेमध्येच देण्यासाठीही जिल्हा परिषदेने नियोजन केले आहे. परंतु, एवढे नियोजन करून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पहिल्या दिवशी गणवेश पोहोचणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. शाळा प्रवेश वाढवण्याबरोबरच, विद्यार्थ्यांच्या स्वागताची आणि गणवेश वाटपाची जिल्हा परिषदेच्या शिक्षणविभागाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा यासाठी प्रतिविद्यार्थी 300 रुपयेप्रमाणे शाळांना सुमारे चार कोटी 85 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. यामुळे एक लाख 20 हजार 800 विद्यार्थिनी, तर 39 हजार 367 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. खेड तालुक्यात लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे मुली 17 हजार 208, तर 23 हजार 273 मुले असून, त्यांना लाभ मिळणार आहे. त्यानंतर शिरूर, हवेलीचा क्रमांक लागणार आहे.

Back to top button