पुण्यात कोयताधारी टोळ्यांनी पुन्हा डोके वर काढले | पुढारी

पुण्यात कोयताधारी टोळ्यांनी पुन्हा डोके वर काढले

महेंद्र कांबळे

पुणे: कोयताधारी टोळ्यांची दहशत मधल्या काळात कमी झालेली असताना रविवारी पुन्हा एकदा कोयताधारी टोळ्यांनी डोके वर काढल्याचा प्रकार समोर आला आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून एक गुन्हा खुनाचा प्रयत्न, तर दुसरे दोन गुन्हे गंभीर जखमी केल्याप्रकरणी दाखल झाले आहेत. तीन गुन्ह्यांपैकी दोन गुन्हे हे परस्परविरोधी आहेत.

पहिल्या गुन्ह्यात किरकोळ बाचाबाचीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्यांवर कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न करून दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या चार ते पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशन उर्फ दिनेश गौड (19), राकेश रमेश सोरटकर (21) आणि रितेश रमेश सोरटकर (18, तिघेही रा. जनता वसाहत) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत दत्तात्रय कानगुडे (26, रा. जनता वसाहत, पर्वती) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दत्तात्रय कानगुडे यांचा मावसभाऊ सागर निवंगुणे याची आरोपी किशन गौड याच्याशी वादावादी झाली होती. दत्तात्रय आरोपी किशनच्या घरावर जाब विचारण्यासाठी गेले. त्या वेळी आरोपी किशनने साथीदारांना तेथे बोलावून घेतले. दत्तात्रय यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपी रियाज शेख, सुनील देडगे यांनी दत्तात्रय यांच्या आईला दांडक्याने मारहाण केली. परिसरात दहशत माजवून घरांवर दगडफेक केली. पोलिस उपनिरीक्षक राजेश पुरी तपास करत आहेत.

खुनाच्या संशयातून कोयत्याने हल्ला

खून प्रकरणातील आरोपीचा मित्र असल्याच्या संशयातून टोळक्याने तरुणाच्या मानेवर आणि डोक्यात उलट्या कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना 28 मे रोजी रात्री दत्तवाडीत घडली. याप्रकरणी चौघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. यश दिनेश मेरवाडे (रा. दांडेकर पूल), ओम रमेश लोंढे (वय 21, रा. दत्तवाडी), राज किशोर दावणे (वय 20 रा. दांडेकर पूल), ऋषिकेश किशोर दावणे (वय 19) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रमोद उर्फ कमलेश घारे (वय 30, रा. दांडेकर पूल) यांनी फिर्याद दिली आहे.

प्रमोद हे 28 मे रोजी त्यांचा मित्र योगेश देशमुखसोबत फोनवर बोलत होते. त्या वेळी 2021 मधील अक्षय किरतकिर्वे याच्या खुनातील आरोपी मयूर भालेरावचा मित्र हा प्रमोद असल्याचा संशय यशला आला. त्यामुळे त्याने साथीदारांना बोलावून घेत प्रमोदच्या मानेवर आणि डोक्यात उलट्या कोयत्याने मारहाण केली, तसेच त्याच्यावर दगड मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक युवराज पाटील तपास करीत आहेत.

हत्यारधारी टोळक्याकडून हल्ला

मित्राला धायरी फाटा येथे सोडून घरी जात असताना जनता वसाहत गल्ली क्रमांक 95 येथे टोळक्याने धारदार कोयत्यांनी वार करून एकाला गंभीर जखमी केले. याप्रकरणी सात जणांच्या टोळक्यावर दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत इंद्रजित गायकवाड (43, रा. जनता वसाहत, पुणे) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रविवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास इंद्रजित गायकवाड यांचा मुलगा सुमित हा त्याचा मित्र सागर रणदिवे याच्यासह त्यांच्या मित्राला धायरी फाटा येथे सोडून घरी परत येत होते. यावेळी जनता वसाहत परिसरात उभ्या असलेल्या सात जणांच्या टोळक्याने काहीही कारण नसताना त्यांची गाडी अडवून सुमित याच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार केले. तसेच सागर रणदिवे याला शिवीगाळ करत दगडाने मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button