नाट्यगृहाचा पडदा उघडणार तरी केव्हा? नाट्य व कलाप्रेमींचा सवाल | पुढारी

नाट्यगृहाचा पडदा उघडणार तरी केव्हा? नाट्य व कलाप्रेमींचा सवाल

धायरी (पुणे): सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथे सुरु असलेल्या नाट्यगृह व कला मंदिराचे काम संथगतीने सुरु आहे. डी. पी. रस्त्यालगत गोयलगंगा सोसायटीसमोर महापालिकेच्या वतीने हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. २०१७ मध्ये सुरु झालेले हे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने या नाट्यगृहाचा पडदा उघडणार तरी कधी, असा प्रश्न नाट्य व कला प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

या नाट्यगृहासाठी गेल्या जानेवारी महिन्यापर्यंत १६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या इमारतीत दोन मजली पार्किंग, आसन व्यवस्था, रंगमंच, मेकअप रूम, पडदा टाकण्याचा बीम, अंडरग्राऊंड पाण्याच्या टाक्या, इत्यादींचे काम पुर्ण झाले आहे. आसन व्यवस्थेवरील छताचे काम प्रगती पथावर आहे. परंतु, वरील दोन माजल्यांचे काम रखडले आहे. उर्वरित कला दालन, छतावरच्या टाक्या, अंतर्गत बांधकाम, प्लॅस्टर, प्लम्बिंग, साईड डेव्हलपमेंट, अंतर्गत इंटेरिअर, विद्युतीकरण, रंगकाम, नक्षी कम आदी कामे अद्यापही बाकी आहे. ही कामे पूर्ण होण्यासाठी अजून किती वेळ लागणार, असा प्रश्न येथील नाट्य रसिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

चालु आर्थिक वर्षात या प्रकल्पासाठी (२०२२-२३ ) सव्वातीन कोटी रुपयांची तरतुद उपलब्ध करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पासाठी एकूण ३५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या नाट्यगृहात १७५० प्रेक्षकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, भव्य कलादालन आणि आर्ट गॅलरी उभाण्यात येणार आहे. पुणे शहरातील पहिले भारतीय शास्त्रीय संगीत महाविद्यालय या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. या महाविद्यालयात गायन ,नृत्य व वाद्य यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे या प्रकल्पांची नागरिकांना उत्सुकता लागली आहे. तसेच कलाकारांसाठी ग्रीन रूम देखील उभारण्यात येणार आहे. या नाट्यगृहास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात येणार आहे. मात्र, या प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत भवन रचना विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी माहिती दिली नाही.

गेल्या सात वर्षांपासून या नाट्यगृहाचे काम सुरू असून, ते अद्यापही पूर्ण झाले नाही. महापालिका प्रशासनाचे या प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याने नाट्य रसिकांसाठी हा प्रकल्प अजूनही मृगजळ ठरत आहे.

– तुषार पाटील, रहिवासी, वडगाव बद्रुक

कला व संस्कृती जोपासण्यासाठी महापालिका प्रशासनाने या नाट्यगृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे गरजचे आहे. हे नाट्यगृहाचे सुरू झाल्यानंतर परिसरातील नाट्यरसिकांचा आनंद द्विगुणित होणार आहे.

-श्रीकांत जगताप, माजी नगरसेवक

Back to top button