चीनसोबत संघर्षांची इच्छा नाही, आमचा भूभाग जाऊ देणार नाही: जनरल अनिल चौहान | पुढारी

चीनसोबत संघर्षांची इच्छा नाही, आमचा भूभाग जाऊ देणार नाही: जनरल अनिल चौहान

पुणे, पुढारी वृत्तसेवा: भारताच्या उत्तर सीमेवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हालचाली वाढत आहेत. १९६२ पासून ते सीमेपासून मागे सरकलेले नाहीत. उत्तर सीमेवर चीनसोबत संघर्ष करण्याची आमची इच्छा नाही. मात्र, असे असलेतरी आमच्या भूभागाचे रक्षण ही आमची जबाबदारी असून, ती आम्ही पार पाडण्यात कमी पडणार नाही, असे मत जनरल अनिल चौहान यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४४ व्या तुकडीचे दीक्षांत संचालन मंगळवारी खेत्रपाल मैदानावर संपन्न झाल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, हिंद महासागरात चीनचा वावर अधिक वाढलेला असून उत्तर सीमेवर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हालचाली वाढल्या आहेत. भारताशेजारील राष्ट्रांची बदलती भूराजकीय परिस्थिती पाहता, लष्कर दोन्ही आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज आहे. चीनशी संघर्ष नको असला तरी देशाच्या भूभागाचे रक्षण करण्यास लष्कर सज्ज आहे.

मुलीही संचलनात…

चौहान म्हणाले, आजच्या संचलन सोहळ्यात मी काही मुली पाहिल्या. त्यांना पाहून मनापासून आनंद झाला. मी या मुलींचे मनापासून अभिनंदन करतो की, आज त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन उभ्या आहेत. इतिहासात झाशीच्या राणीने ब्रिटिशांशी लढा दिला. त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा प्रेरणा घेऊन देशासमोरील आव्हानांना तोंड देत देशाचे रक्षण कराल. जेव्हा स्वतःला विसरून तुम्ही देशाची सुरक्षा कराल तेव्हा तुम्ही खरे सैनिक म्हणून ओळखले जाल.

मणिपूरमध्ये अजूनही आव्हान..

मणिपूरमध्ये जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. २०२० मध्ये लष्कर आणि आसाम रायफल्स तेथे तैनात होते. त्यावेळी तेथील परिस्थिती नियंत्रणात होती, यामुळे कालांतराने येथील लष्कर कमी करण्यात आले. तेथील बंडखोरी नियंत्रणात आली आहे. दरम्यान, जे सध्या मणिपूर येथे सुरू आहे, त्याचा बंडखोरीशी काही संबंध नाही. मणिपूर येथे असलेल्या दोन जातींमधील हा संघर्ष आहे, यामुळे त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आसाम रायफल्स आणि लष्कराने त्या ठिकाणी खूप चांगलं काम केलं आहे. अद्याप मणिपूरमधील आव्हाने संपलेली नाहीत. पण, येत्या काळात परिस्थिती पूर्वपदावर येईल.

तिन्ही दलांच्या एकत्रिकरणाच्या प्रक्रियेला वेग..

भारतीय लष्कर वेगाने बदल करत आहे. यातील महत्त्वाचा बदल म्हणजे तिन्ही दलांचे एकत्रीकरण करणे हा आहे. लष्कराच्या ‘थेटरायझेशन’ची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या अंतर्गत संयुक्तता आणि एकत्रीकरण हे दोन भाग असून, या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात त्या दिशेने आमचं काम सुरू असल्याचेही चौहान यांनी पत्रकारांना सांगितले.

Back to top button