प्रीमिअर हँडबॉल लीगसाठी ‘महाराष्ट्र आयर्नमन’च्या जर्सीचे अनावरण! | पुढारी

प्रीमिअर हँडबॉल लीगसाठी 'महाराष्ट्र आयर्नमन'च्या जर्सीचे अनावरण!

पुणे, पुढारी वृत्तसेवा: आठ जूनपासून सुरू होणाऱ्या प्रीमिअर हँडबॉल लीगमध्ये भाग घेण्यासाठी सज्ज असलेल्या महाराष्ट्र आयर्नमन संघाने मंगळवारी पुण्यात एका शानदार कार्यक्रमात या हंगामासाठी त्यांच्या जर्सीचे अनावरण केले. यावेळी संघमालक पुनित बालन आणि क्रिकेटपटू केदार जाधव यांच्यासह मुख्य प्रशिक्षक सुनील कुमार आणि सहायक प्रशिक्षक अजय कुमार उपस्थित होते. केदार जाधव हे महाराष्ट्र आयर्नमेनचे चाहते आहेत.

हँडबॉल हा एक ऑलिम्पिक खेळ असल्याने, तो पुनित बालन ग्रुपच्या दृष्टीक्षेपात आहे. त्यांची ही दृष्टी भारतात क्रिकेटेतर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विकसित करण्याच्या उत्कटतेशी पूर्णपणे जुळते, जेणेकरून देश ऑलिम्पिक खेळांमध्ये नवीन उंची गाठू शकेल.

कार्यकमाला संबोधित करताना पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन म्हणाले की, “हँडबॉल हा एक ऑलिम्पिक खेळ आहे, हे आपण सर्व जाणतो आणि या खेळाला भारतात पुढच्या स्तरावर नेण्याचा आमचा दृष्टीकोन आहे. त्यामुळे आपले खेळाडू देखील या खेळात ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे आणि पदके जिंकण्याचे स्वप्न पाहू शकतात. आपल्या खेळाडूंना सर्वांगीण अनुभव देऊन त्यांना योग्य संधी आणि समर्थन प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे. महाराष्ट्र आयर्नमेन देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक चाहत्यांना आकर्षित करतील.”

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांनी सांगितले की, हँडबॉलशी त्यांचे विशेष नाते आहे आणि ते संपूर्ण हंगामात महाराष्ट्र आयर्नमनला सपोर्ट करतील. “मी शाळेत हँडबॉल खेळलो आहे आणि या खेळाशी माझा विशेष नातं आहे. आपण सर्वांनी ऑलिम्पिकमध्ये हा खेळ पाहिला आहे आणि मला खात्री आहे की, पुनित बालन आणि महाराष्ट्र आयर्नमनच्या दूरदृष्टीने आपण लवकरच त्या स्तरावर पोहोचू. मी महाराष्ट्राचा आहे, त्यामुळे महाराष्ट्र आयर्नमनबद्दलचे प्रेम स्वाभाविकपणे येते. सर्व खेळाडू आणि कर्मचारी यांना माझ्या शुभेच्छा आणि मला खात्री आहे की, ते लीग जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील,” असे केदार जाधव म्हणाले.

महाराष्ट्र आयर्नमेनचे मुख्य प्रशिक्षक सुनील कुमार म्हणाले, “स्पर्धेसाठी आमची चांगली तयारी सुरू आहे. प्रीमिअर हँडबॉल लीग ही दीर्घ स्पर्धा होणार असल्याने आम्ही खेळाडूंच्या फिटनेसवर भर देत आहोत. आम्ही बरेच सामने खेळू आणि त्यानुसार आमची तयारी करत आहोत.”

प्रीमिअर हँडबॉल लीग जयपूर, राजस्थानमधील सवाई मानसिंग इनडोअर स्टेडियममध्ये ८ ते २५ जून २०२३ या कालावधीत खेळवली जाईल. वायकॉम १८ नेटवर्क – स्पोर्ट्स १८-१ (HD आणि SD) आणि स्पोर्ट्स १८ खेल या वाहिन्यांवर थेट प्रसारित केली जाईल. JioCinema वरही ही लीग पाहता येणार आहे.

Back to top button