राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 28.56 टक्के पाणीसाठा | पुढारी

राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ 28.56 टक्के पाणीसाठा

पुणे, शिवाजी शिंदे : राज्यात उन्हाळ्याचा तडाखा वाढला असून, धरणांतील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. ऐन उन्हाळाच्या दिवसात पाणीवापर सरासरीपेक्षा अधिक झाल्यामुळे सध्या केवळ 28.56 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी हा साठा 30.32 टक्के होता. राज्यात पावसाला लवकर सुरुवात न झाल्यास, जून महिन्यातच काही भागात पाणीटंचाईची स्थिती गंभीर होण्याची शक्यता असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

जलसंपदा विभागाचे राज्यात अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे असे सहा विभाग आहे. या सहा विभागात लहान, मध्यम प्रकल्प आणि मोठी अशी एकूण 3 हजार 267 धरणे आहेत. गेल्या वर्षी दुस-या टप्प्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली होती. त्यामुळे ही धरणे शंभर टक्के भरली होती. विदर्भ, मराठवाडा हा भाग कायम दुष्काळी मात्र, मागील वर्षीच्या पावसामुळे या भागातील नद्यांंना सलग कित्येक दिवस पूर आले होते. अनेक ठिकाणी धरणे पूर्ण भरल्यानंतर नद्यांच्या पात्रात जादा पाणी सोडून देण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने धुमाकूळ घातला होता. याही भागात नद्याना मोठे पूर आले होते. मात्र, पाण्याचा अतिवापर झाल्यामुळे फेब्रुवारी, मार्च महिन्यांपर्यंत धरणामधील पाणीसाठा निम्म्याहून कमी झाला. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात पाण्याचा साठा कमी होत गेला. त्यामुळे पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

राज्यातील सहा विभागामधील धरणांपैकी सध्या कोकणातील धरणांंमध्ये 33.84 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी 39.09 टक्के पाणीसाठा होता. पुणे विभागात 19.20 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी या विभागात 21.89 टक्के पाणी होता. नाशिक विभागात 30.13 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी या विभागात 24.70 टक्के पाणीसाठा होता. नागपूर विभागातील धरणांमध्ये सध्या 39.53 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी या विभागात 29.18 टक्के पाणीसाठा होता. अमरावती विभागातील धरणामध्ये 39 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी 36.65 टक्के पाणीसाठा होता. औरंगाबाद विभागात 31.94 टक्क्यांवर पाणीसाठा पोहोचला आहे. मागील वर्षी याच दिवसात 30.40 टक्के पाणीसाठा होता.

Back to top button