आरटीई प्रवेशासाठी अजून किती प्रतीक्षा ? प्रतीक्षा यादीतील पालकांचा संतप्त सवाल | पुढारी

आरटीई प्रवेशासाठी अजून किती प्रतीक्षा ? प्रतीक्षा यादीतील पालकांचा संतप्त सवाल

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत नियमित यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश 22 मे पर्यंत करण्यात आले. तर त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले होते. परंतु, एक आठवडा उलटल्यानंतरही याबाबत कोणतीही प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे आरटीई प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी अजून किती प्रतीक्षा करायची, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यातील 8 हजार 823 शाळांतील 1 लाख 1 हजार 846 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी एकूण 3 लाख 64 हजार 413 अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठीच्या सोडतीतून 94 हजार 700 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. 13 एप्रिलपासून प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार प्रवेशासाठीची मुदत 22 मे रोजी संपली. या मुदतीत सुमारे 63 हजार 500 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. त्यामुळे उपलब्ध जागांपैकी 38 हजार 346 जागा रिक्त राहिल्याचे आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. प्रतीक्षा यादीत तब्बल 81 हजार 129 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्यामुळे रिक्त जागांवर संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

Back to top button