पुणे हादरलं ! आधी प्रियकराला भोकसून मारले, नंतर प्रेयसी हाताची नस कापून बाकड्यावर बसली | पुढारी

पुणे हादरलं ! आधी प्रियकराला भोकसून मारले, नंतर प्रेयसी हाताची नस कापून बाकड्यावर बसली

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या प्रेयसीने वर्गमित्र असलेल्या प्रियकराच्या खासगी वसतिगृहातील खोलीत जाऊन भाजी कापण्याच्या चाकूने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना वाघोलीतील रायसोनी कॉलेज रोडवर सोमवारी पहाटे घडली. खून केल्यानंतर तिनेही स्वतःची नस कापून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. यशवंत अशोक मुंढे (वय 22, सध्या रा. वाघोली, मूळ, रा. लातूर) असे मृताचे नाव आहे, तर अनुजा महेश पनाळे (वय 21, सध्या रा. वाघोली, मूळ रा. अहमदनगर ) असे खून करणाऱ्या प्रेयसीचे नाव आहे. दोघेही वाघोलीतील रायसोनी महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षात शिकत होते.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुजा व यशवंतमध्ये प्रेमसंबंध होते. तो सारखा तिच्यावर संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात भांडणे व्हायची. तो तिला अनेक बंधने घालत होता. रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ती त्याच्या खासगी वसतिगृहातील खोलीत अभ्यासासाठी गेली. ते एका बेडरूममध्ये होते, तर खोलीतील बाकी विद्यार्थी दुसर्‍या बेडरूममध्ये होते. मध्यरात्री त्यांचे पुन्हा भांडण झाले. अनुजा हिने चाकूने यशवंतच्या छातीवर व पोटावर वार केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर ती खाली पळून आली. तिने हाताची नस कापून ती इमारतीसमोरील बाकड्यावर बसली. तेथून जाणार्‍या अन्य विद्यार्थ्यांनी तिची अवस्था पाहून पोलिसांना 100 नंबर वर कळविले व तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. नंतर पोलिसांना खुनाची घटना कळाली. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनीही भेट दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस करीत आहेत.

अनुजा हिला त्याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. तिने स्वतःची नस कापल्याने रक्तस्त्राव झाला होता. यामुळे तिला भोवळ येत होती. तिला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने तिचे प्राण वाचले. ती धोक्याच्या बाहेर असून, दुपारी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले.

– गजानन पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस ठाणे.

Back to top button