

आशिष देशमुख
पुणे : शहरात यंदाच्या हंगामात प्रथमच सलग २५ दिवस वेदर डिस्कंफर्ट (अस्वस्थ करणारा उकाडा) पुणेकरांनी सहन केला असून शहरातील कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, वडगाव शेरी, हडपसर, चिंचवड, लवळे, मगरपट्टा हे भाग उष्णतेची बेटे बनली आहेत. वाढती उष्णता व ५५ ते ७० टक्क्यांवर गेलेली आर्द्रता, यामुळे यंदाचा उन्हाळा अस्वस्थ करणारा ठरला आहे.
गेल्या वर्षापासून शहरातील कोरेगावचा पारा सतत देशात तीनवेळा सर्वाधिक होता, तर यंदाही कोरेगाव पार्कसह शिवाजीनगर, वडगाव शेरी, मगरपट्टा, हडपसर, चिंचवड, लवळे या भागांची या यादीत नव्याने भर पडली आहे. शहरातील वाढती उष्णतेची बेटे आणि वाढती आर्द्रता, याचा स्वतंत्र अभ्यास हवामान विभाग करीत आहे.
यंदा फेब्रुवारीत शहराचा पारा ४० अंशांवर गेला. शिवाजीनगरचे तापमान ४१ अंशांवर, तर कोरेगाव पार्क, वडगाव शेरी या भागांचा पारा ४२ अंशांवर गेला होता. मात्र, मार्चमध्ये बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांनी शहरात सतत पाऊस सुरू झाला. आर्द्रता वाढली आणि तापमान ३१ ते ३४ अंशांवर स्थिर राहिल्याने एकही दिवस उष्णतेची लाट नव्हती.
यंदा एप्रिल महिन्यात १२ दिवस, तर संपूर्ण मे महिन्यात शहरात उष्णतेच्या लाटा जाणवल्या. यात १० ते १२ एप्रिल हे तीन दिवस तीव्र उष्णतेची लाट होती. त्या कालावधीत शिवाजीनगरचा पारा सतत ४२ अंशांवर होता, तर कोरेगाव पार्क, वडगाव शेरी, चिंचवड, मगरपट्टा, लवळे हे भाग ४३ अंशांवर गेले होते. मेमध्ये ही लाट अधिकच तीव्र झाली. या महिन्यात वाढते तापमान व वाढती आर्द्रता यांचा संगम सतत २५ दिवस होता. त्यामुळे कोकणात जशी वातावरणात अस्वस्थता होती, तसेच वातावरण शहरातील या सर्व भागांत होते.
शहरात कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, चिंचवड, वडगाव शेरी, मगरपट्टा या भागांतून उष्णता लवकर बाहेर पडली नाही. तेथे उष्णतेची बेटे तयार झाल्याने इतर भागांपेक्षा तापमान ३ ते ५ अंशांनी जास्त होते. या उलट विद्यापीठ परिसर, पाषाणच्या काही भागांसह जेथे हिरवीगार शेती, झाडे व हरितछत्र खूप दाट आहे ते भाग कमी तापले, तेथे वेदर डिस्कंफर्ट कमी जाणवला.
शहरातील उष्णतेच्या लाटा.. (दुपारी १२ वाजता)
– एप्रिल १२ दिवस (सरासरी पारा : ४१ अंशांवर)
– मे २५ दिवस (सरासरी पारा ४२ अंशांवर)
यंदा शहरात आर्द्रता सतत ५० ते ५५ टक्क्यांवर आहे तसेच वाढते तापमान, या दोन्हींच्या संगमाला वेदर डिस्कंफर्ट, असे म्हणतात. अशा वातावरणामुळे माणसाला अस्वस्थ वाटते. त्यामुळे हवामान विभागाने सतत उन्हात फिरू नका, सुती कपडे घाला, पाणी, सरबत प्या, असा सल्ला दिला आहे. शहरात काही भाग सतत खूप तापत आहेत, यावर आमचा अभ्यास सुरू आहे.
– डॉ. के. एस. होसाळीकर,अतिरिक्त महासंचालक, हवामान विभाग पुणे