पुणे : पालखी मार्गावर ट्रकचा अपघात; निरा नदीच्या पुलावरील घटना

पुणे : पालखी मार्गावर ट्रकचा अपघात; निरा नदीच्या पुलावरील घटना
Published on
Updated on

निरा; पुढारी वृत्तसेवा : पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या हद्दीवरील व पुणे – पंढरपूर पालखी मार्गावरील निरा नदीच्या पुलावर भरधाव ट्रक पुलावरील पादचारी मार्गात घुसला. परंतु, पुलाच्या संरक्षक कठड्यामुळे ट्रक नदीत कोसळता कोसळता वाचला. त्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, अकरा वर्षांपूर्वी पालखी सोहळ्यात निरा नदीच्या पुलावरून वारक-यांचा ट्रक निरा नदीत उलटला होता. त्या घटनेच्या आठवणीची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती.

पालखी मार्गावरील निरा नदीच्या पुलावर ट्रकला रविवारी (दि. 28) दुपारी साडेबाराच्या सुमारास अपघात झाला. लोणंद (जि. सातारा) बाजूकडून मालवाहतूक करणारा ट्रक (एमएच 12 एचडी 0191) निरा बाजूकडे चालला होता. अचानक दुचाकीस्वाराने कट मारल्याने ट्रकचालकाने स्टेअरिंग डाव्या बाजुला ओढले. यात ट्रकचे पुढील बाजूचे डावे चाक फूटपाथवर गेले. दरम्यान, चालकाने ब—ेक मारल्याने ट्रक नदीत कोसळता कोसळता वाचला.

निरा, पाडेगाव, निंबूत, वाघळवाडी, मळशी येथील युवकांनी प्रयत्न करत कठड्यावरून ट्रक पुन्हा रस्त्यावर आणला. यादरम्यान सुमारे दीड तास वाहतूक कोंडी झाली होती. पालखी मार्गावर निरा बस स्थानकापर्यंत, तर पाडेगाव ऊस संशोधन केंद्रापर्यंत व नगर मार्गावर बुवासाहेब चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक युवकांनीच वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

11 वर्षांपूर्वीच्या आठवणीला उजाळा

सुमारे अकरा वर्षांपूर्वी आळंदीवरून पंढरपूरकडे निघालेल्या पालखी सोहळ्यातील ट्रकचालकाला निरा नदीवरील नवीन पुलाच्या कठड्याचा रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने ट्रक वारक-यांसह निरा नदीत उलटला. यात पाच वारक-यांचा मृत्यू झाला होता. निरा नदीच्या पुलाजवळ निरा बाजूला व पाडेगाव बाजूला अपघातप्रवण क्षेत्र असतानाही येथे गतिरोधक, दिशादर्शक फलक, रिप्लेक्टर बसविण्यात आलेले नाहीत.

पालखी मार्गावरील सासवडच्या बसस्थानकासमोर व पीएमटी बसस्थानकासमोर गतिरोधक आहेत. मात्र, निरा नदीच्या पुलाजवळील अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आलेले नाहीत. महामार्ग प्राधिकरणासह, पुणे व सातारा जिल्ह्याचे प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news