राज्यात गुरुवारपर्यंत उकाडा, हलका पाऊसही | पुढारी

राज्यात गुरुवारपर्यंत उकाडा, हलका पाऊसही

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या काही भागातील तापमान तीन ते चार अंशांनी घटले असले तरी बहुतांश भागांत येत्या गुरुवारपर्यंत उकाडा कायम राहणार आहे. सोबत हलका ते मध्यम पाऊसही पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, मान्सून अद्याप निकोबार बेटावरच अडकला आहे. तो फार पुढे सरकलेला नाही. उत्तर भारतात नवा पश्चिमी चक्रवात रविवारी सक्रिय झाला. त्यामुळे काही भागांत पाऊस सुरू झाला आहे.

मान्सून निकोबार बेटावर पोहोचल्याने दक्षिणी किनारपट्टीला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर व दक्षिण भारतात पाऊस सुरू आहे. राजस्थानात रविवारी बिकानेर येथे मुसळधार पाऊस झाला. पोखरण, जैसलमेर भागात धुळीचे वादळ सक्रिय झाले. भरदुपारी अंधार दाटून आला होता. मध्य भारत मात्र कोरडा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम आहे. ती गुरुवारपर्यंत कायम राहील. उष्णतेच्या लाटेसह विदर्भात पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. बुधवार आणि गुरुवारी विदर्भात जोरदार पडेल. मात्र मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणात हलक्या पावसाचा अंदाज आहे.

राज्यातील तापमान…

चंद्रपूर 43, यवतमाळ 41.6, वर्धा 41.4, नागपूर 41.1, बुलढाणा 38.2, अमरावती 40, जळगाव 41, नाशिक 35, पुणे 35.6, कोल्हापूर 34.4, महाबेळ्श्वर 30, नाशिक 35, सांगली 37.3, छत्रपती संभाजीनगर 38.4.

Back to top button