राज्यात खरिप हंगामात 152 लाख हेक्टरवर होणार पेरण्या | पुढारी

राज्यात खरिप हंगामात 152 लाख हेक्टरवर होणार पेरण्या

किशोर बरकाले

पुणे : राज्यात खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन व कापूस या पिकांखाली सर्वाधिक क्षेत्र असून, अन्य पिकांमध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमुगाचा समावेश आहे. राज्यात गतवर्षीच्या खरिपात 147 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. त्या यंदाच्या खरीप हंगामात पाच लाख हेक्टरने वाढून 152 लाख 13 हजार हेक्टरवर जाण्याची अपेक्षा आहे. पेरण्यांसाठी बी-बियाणे, खतांची मुबलकता असल्याची माहिती कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) विकास पाटील यांनी दिली.

खरीप पिकांच्या पेरण्यांसाठी आपल्याकडे 21 लाख 77 हजार क्विंटल बियाणांचे नियोजन केलेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून (महाबीज) 2 लाख 8 हजार क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून (एनएससी) 55 हजार क्विंटल तर खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून सर्वाधिक म्हणजे 19 लाख 14 हजार क्विंटल इतक्या बियाणांच्या पुरवठ्याचे नियोजन झालेले आहे. गरजेपेक्षा अधिक बियाणांची उपलब्धता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोयाबीन पिकाखाली 50 लाख हेक्टर, कापूस 43 लाख हेक्टर आणि त्यानंतर 15.50 लाख हेक्टर इतके भाताचे क्षेत्र असल्याचे नमूद करून ते म्हणाले, चालू वर्षी पेरण्यांमध्ये पाच लाख हेक्टरने वाढ अपेक्षित धरण्यात आलेली आहे. काही पिकांखालील क्षेत्रावरील पेरण्या कमी-जास्त होत राहतात. या व्यतिरिक्त उसाची लागवडही 11 लाख हेक्टरवर अपेक्षित राहील.

25लाख मेट्रिक टन खते उपलब्ध

केंद्र सरकारने महाराष्ट्राला खरीप हंगामासाठी 43 लाख मेट्रिक टन खतपुरवठा मंजूर केलेला आहे. राज्यात प्रत्यक्षात मागील हंगामातील खतांची 20 लाख मेट्रिक टनांची उपलब्धता आहे. उर्वरित खतपुरवठाही सुरळीत सुरू असून, हंगामात खतांची मुबलक उपलब्धता राहील. खरीप हंगामाचा विचार करता 2020 मध्ये 46.95, 2021 मध्ये 43.34 आणि गतवर्ष 2022 मध्ये 37.68 लाख मेट्रिक टन खतांचा वापर प्रत्यक्षात झाला होता. दरम्यान, 8 मे अखेर राज्यात 25 लाख मेट्रिक टन खतांची उपलब्धता असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

Back to top button