सातारा जिल्हाधिकार्‍यांनी केली निरा स्नानाच्या स्थळाची पाहणी | पुढारी

सातारा जिल्हाधिकार्‍यांनी केली निरा स्नानाच्या स्थळाची पाहणी

निरा; पुढारी वृत्तसेवा :श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 18 जूनला निरा स्नान आटोपून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पाडेगाव (ता. खंडाळा) येथील निरा नदीतीरावरील श्री दत्त घाटावरील निरा स्नानाच्या स्थळाची रविवारी (दि. 28) सकाळी साडेदहा वाजता पाहणी केली.

या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, वाई- खंडाळ्याचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, खंडाळ्याचे प्रभारी तहसीलदार चेतन मोरे, लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, खंडाळ्याचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्यासह जलसंपदा, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील माउलींच्या पालखीचा सातारा जिल्ह्यात जेथे प्रवेश होतो त्या पाडेगाव (ता. खंडाळा) येथील रस्ता व निरा नदी पुलाजवळील अपघातप्रवण क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दिशादर्शक फलक, बाळू पाटलाची वाडी येथे झेब—ा क्रॉसिंगची मागणी पाडेगावचे माजी सरपंच विजय धायगुडे, नामदेव धायगुडे यांनी जिल्हाधिकारी जयवंशी यांच्याकडे केली.

जिल्हाधिकारी जयवंशी यांनी निरा नदीवरील बि—टिशकालीन जुन्या पुलाची पाहणी करून निरा नदीवरील जुन्या पुलाचे तुटलेले संरक्षक कठडे नव्याने बसवावेत, पुलाला रंगरंगोटी करावी, दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांना दिले. या वेळी पाडेगावच्या सरपंच अनिता मर्दाने, उपसरपंच संतोष माने, शंकरराव मर्दाने, गजानन माने, माजी सरपंच हरिश्चंद्र माने, माजी उपसरपंच रघुनाथ धायगुडे, बिपीन मोहिते, संतोष मर्दाने, ग्रामसेविका साधना जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

पालखी अनुदान वाढविण्याची मागणी

पालखी सोहळ्यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान अपुरे आहे. यंदा चार लाख रुपये अनुदान मंजूर करावे, अशी मागणी पाडेगावचे ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ धायगुडे, हरिश्चंद्र माने यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे केली.

Back to top button