पुणे : तरुणीला पार्टटाईम जॉब पडला 30 लाखांना | पुढारी

पुणे : तरुणीला पार्टटाईम जॉब पडला 30 लाखांना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उच्चशिक्षित तरुणीला पार्टटाईम जॉबच्या बहाण्याने यूट्युबवरील व्हिडीओ लाईकचे टास्क देऊन सुरुवातीला मोबदला देण्यात आला. दरम्यान, तिचा विश्वास बसल्यानंतर तिला प्रीपेड टास्क देऊन तिने 30 लाख 8 हजार रुपये भरल्यानंतर तिला कोणताही मोबदला न देता फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मूळच्या भोपाळ येथील तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणी ही वडगाव शेरी येथे राहते. तर तिचा भाऊ हा मुंबई येथे नोकरीस असून, ती स्वत: खराडी येथील एका कंपनीत नोकरीस आहे. तरुणीला दि. 01 मे रोजी व्हॉट्सअ‍ॅपवर पार्टटाइम नोकरीबाबत मेसेज मिळाला. त्यामध्ये यूट्युबवरील व्हिडीओ लाईक केल्यास त्यांच्या कंपनीकडून त्याबदल्यात पैसे मिळणार, असे सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी काही टास्क तिला व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवले. व्हिडीओ लाईक केल्यास 150 रुपये मिळणार होते.

लिंकमधील व्हिडीओ ओपन करून लाईक करून त्याचा स्क्रिनशॉट त्यांना पाठवला. त्यानंतर त्यांनी तिला टेलिग्राम लिंक देऊन त्यांच्या रिसेप्शनिस्टसोबत संपर्क करण्यास सांगितले. रिसेप्शनिस्टने तक्रारदार तरुणीला तीन टास्कचे पैसे देणार असल्याचे कळविले. पुढे त्यांनी टेलिग्राम अकाउंटवर तरुणीला वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितली. त्यामध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, बँकेचे नाव, खाते नंबर तिला टास्कचे पैसे मिळणार यासाठी त्यांनी विचारलेली सर्व माहिती भरली. तसेच पैसेही भरले. पुढे ती सातत्याने पैसे मिळेल या हेतूने पैसे भरत गेली. तब्बल 30 लाख 8 हजार भरले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

प्रीपेड टास्कच्या नावाखाली तरुणाची फसवणूक

टेलीग्रामवरून तरुणाशी संपर्क साधून त्याला गुगल टास्कबद्दल सांगून सुरुवातील 150 रुपये पाठवले. नंतर त्याला प्रीपेड टास्क सांगून वेळोवेळी त्याच्याकडून तब्बल 3 लाख 20 हजार रुपये घेतले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर अजिंक्य रवींद्र कांबळे (रा. मांजरी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार 7 ते 8 मार्च 2023 दरम्यान घडला.

Back to top button