पारगाव : कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ड्रोनचा वापर | पुढारी

पारगाव : कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ड्रोनचा वापर

पारगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : अलीकडे शेती क्षेत्रात आधुनिक तंत्राचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणावर करू लागले आहेत. याचा फायदा देखील शेतकर्‍यांना मिळत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत चालल्याने उसावरील रोगराईचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकर्‍यांना विविध औषध फवारण्या कराव्या लागत आहेत. यासाठी शेतकरी आता फवारणीसाठी ड्रोन यंत्राचा सर्रास करू लागले आहेत. यामध्ये शेतकर्‍यांचा वेळ व कष्ट वाचत आहे.

तालुक्याच्या पूर्वभागात उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आता उसाच्या पिकासाठी शेतकरी आधुनिक तंत्राचा वापर करताना दिसत आहेत. ऊस पिकाचे क्षेत्र अधिक असल्याने औषध फवारणी करताना शेतकर्‍यांना अडचणी यायच्या. परंतु, आता विविध कीटकनाशकांच्या फवारणीसाठी शेतकरी ड्रोन यंत्रांचा वापर करू लागले आहे. यामुळे शेतकर्‍यांचे वेळ व श्रम वाचून कमी पैशांमध्येच औषध फवारणी होऊन जात आहे. त्यामुळे ड्रोन शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरू लागला आहे.

उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाल्याने रोगराईंवरील प्रादुर्भाव टाळण्यासाठी औषध फवारणीसाठी या पूर्व काळात मोठे कष्ट लागत होते. यासाठी शेतमजुरांच्या हातापाया पडावे लागत होते. परंतु, ड्रोन फवारणीसाठी फायदेशीर ठरत आहे. यामुळे वेळेची बचत होते. शिवाय पैसे देखील कमी लागतात. यामुळे ड्रोनचा वापर अतिशय फायदेशीर ठरत आहे, असे शेतकरी राहूल शांताराम लोखंडे यांनी सांगितले.

 

 

Back to top button